अमरावती : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा अट्टाहास सोडून, सरकारने राजभवनाच्या जागेवर स्मारक उभारावं, अशी मागणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलीय. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रातील स्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेल्या दुर्घटनेत सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही मागणी केली.

यावेळी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, शिवस्मारक हे अशा ठिकाणी पाहिजे, ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे दर्शन झाले पाहिजे. समुद्रात सर्वसामान्य नागरिक 200 रुपये खर्च करुन शिवस्मारक पाहायला जाऊच शकत नाही. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे पुरुषोत्तम खेडेकर अमरावतीत म्हणाले.

शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी अपघात

मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागलं. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला.