शिर्डी : पुणतांबा गावातील कृषिकन्यांनी तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवलं आहे. पुणतांबा ग्रामस्थांनी आज पाठिंबा देत गाव कडकडीत बंद ठेवलं आहे. पुणतांबा गावातील शाळकरी मुलींनी आंदोलनात सहभाग घेत आंदोलन करणाऱ्या मुलींच्या समर्थनार्थ गावातून काळे झेंडे घेऊन फेरी काढली. सरकार विरोधात घोषणाबाजी करत शालेय विद्यार्थिनींनी देखील आंदोलनाला पाठींबा दिला आहे.


दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा पुणतांबा गावातून युवतींनी एकत्र येत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या तीन दिवसापासून पुणतांबा गावात शुभांगी जाधव, निकिता जाधव व पूनम जाधव या शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. याकडे सरकारचं मात्र अद्यापही दुर्लक्ष आहे.

तीन दिवसात या मुलींचं वजन दोन किलोने घटलं असल्याची माहिती आहे. आज तिसऱ्या दिवशी पुणतांबा गाव कडकडीत बंद ठेवत ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे तर शालेय विद्यार्थिनींनी देखील मोर्चा काढून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

काल राहात्याचे तहसीलदार माणिक आहेर, पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी उपोषणस्थळी येऊन आंदोलनकर्त्या निकिता जाधव, शुभांगी जाधव, पुनम जाधव यांची भेट घेतली. सरकारकडे मागण्या पोहचवण्याचं आश्वासनही दिलं. मात्र आंदोलक मुली अन्नत्याग आंदोलनातून माघार घ्यायला तयार नाहीत.

आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील आंदोलक मुलींनी दिला आहे.