पुणे : लग्न ठरत नसल्याने पुण्याच्या आळंदी येथील एक तीस वर्षीय तरुण थेट हायटेन्शन टॉवरवरच चढून बसला होता. विशेष म्हणजे तो खाली उतरविण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरची मागणी देखील करत होता. तीन तास टॉवरवर त्याने एक झोपही काढली, ज्यानंतर तब्बल साडे नऊ तासांची नौटंकी झाल्यानंतर शर्थीच्या प्रयत्नांनी त्याला खाली आणण्यात यश आलं. किशोर पैठणे असं या तरुणाचं नाव आहे. 


शनिवारी रात्री दहाच्या सुमारास किशोर आळंदीच्या हायटेन्शन टॉवर वर चढला. काही नागरिकांच्या तो निदर्शनास आला. आत्महत्या करण्यासाठीच तो टॉवर वर चढल्याची चर्चा सुरू झाली. काहींनी आळंदी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आधी तातडीनं महावितरण विभागाला विद्युत पुरवठा बंद करायला सांगितला. मग अग्निशमन दल तिथे पोहोचलं. पोलीस, महावितरण विभाग आणि अग्निशमन दलाचे जवान अकराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. किशोरला खाली घेण्यासाठी मनपरिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तुला कोणाचा राग आलाय का? कोणत्या सरकारी विभागावर तुझी नाराजी आहे का? तुझं कोणाशी भांडण झालंय का? तुझ्यावर कोणी अन्याय करतंय असं तुला वाटतंय का? असे अनेक प्रश्न त्याला विचारले जायचे. पण प्रत्येक प्रश्नाला नकार द्यायचा. त्याच्याशी कोणताही संवाद सुरू झाला की हा गडी थेट टॉवरच्या टोकाला जाऊन उभा रहायचा. काहीवेळाने तो एकाच जागी स्तब्ध होता. तेंव्हा लक्षात आलं की प्रशासकीय यंत्रणेची झोप उडविणारा महाशय किशोर झोपी गेला होता. टॉवरच्या अँगलवरच झोप काढून तो तीन तासाने जागा झाला. यंत्रणा मात्र डोळ्यात तेल घालून त्याला कसं खाली घ्यायचं यासाठी तर्क लढवत होती.


अखेर खाली उतरवण्यात यश


झोपून उठल्यावर किशोरने आता मला खाली उतरता येईना, मला खाली घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणा, अशी मागणी केली.  मग तर तेथे उपस्थित सर्वचजण वैतागले. काहीही करून आधी त्याला सुखरूप खाली घ्यायचं होतं. अशात दिवस उजाडला, तरी तो खाली येण्याचं नाव घेईना. शेवटी सातच्या सुमारास यंत्रणांनी अधिक शर्थीचे प्रयत्न सुरु केले. टॉवरच्या तिन्ही दिशेने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला घेरलं, तो कधीही खाली उडी मारेल म्हणून चहुबाजूंनी जाळी टाकण्यात आली. आता खाली उतरण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नव्हता, त्यामुळे साडे सातच्या सुमारास त्याने जाळीवर उडी घेतली अन सर्वांचाच जीव भांड्यात पडला. साडे नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर किशोर सुखरूप खाली आला होता.


लग्न ठरेना म्हणून चढला टॉवरवर


किशोरची पोलिसांनी कसून चौकशी केली. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेळा बुद्रुक गावचा रहिवाशी असल्याचं समोर आलं. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून घरातून निघून जाणं अन मग तीन-चार दिवसांनी कुठं ही भटकून घरी परतायचं, ही त्याची सवयच होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. पण अलीकडेच काही दिवसांपासून तो पुण्याच्या वाघोलीत नोकरी करायला आला होता. तिथल्या पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीत काम करू लागला. अशातच त्याच्या लहान भावाचे लग्न ठरले, मग तो भलताच वैतागला. यातूनच त्याचं डोकं फिरलं. मग तो कंपनीच्या गाडीतून शनिवारी तो आळंदीत आला आणि त्याने हे सर्व केलं, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha