पुणे: राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे विधानपरिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांनी 440 मतांसह विजय मिळवला.
विधानपरिषद निवडणूक निकाल
या निवडणुकीत राष्ट्रवादीने नुसतीच बाजी मारली नाही, तर विरोधात लढणाऱ्या काँग्रेसची मतंही फोडली. त्यामुळे पहिल्याच फेरीत राष्ट्रवादीचा विजय पक्का झाला.
अनिल भोसले
काँग्रेसची मतं फोडली
काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना 71 मतं मिळाली. काँग्रेसची 124 मतं होती, मात्र केवळ 71 मतंच जगताप यांना मिळाली. विधानपरिषद निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं असताना, राष्ट्रवादीने काँग्रेसची तब्बल 53 मतं फोडली. त्यामुळे काँग्रेस हा मोठा फटका आहे.
भाजपचे येनपुरे दुसऱ्या क्रमांकावर
या निवडणुकीत भाजपचे अशोक येनपुरे हे 133 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. येनपुरे कडवी झुंज देतील अशी आशा होती. मात्र विजयी उमेदवाराला मिळालेली मतं पाहता, येनपुरेंची झुंज खूपच तोकडी ठरली.
अशोक येनपुरे
युतीची मतंही राष्ट्रवादीला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार अनिल भोसले यांना मिळालेली मतं पाहता, त्यांनी केवळ काँग्रेसचची नव्हे तर शिवसेना-भाजप युतीचीही मतं फोडल्याचं दिसून येतंय. शिवसेना 76 आणि भाजप 71 अशी मिळून युतीची 147 मतं होती, मात्र येनपुरेंना 133 मतं मिळाली. म्हणजे 14 मतं फुटली.
एकूण 698 मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे 298 मतं होती. काँग्रेसकडे 151, भाजपकडे 71 तर शिवसेनेकडे 76 मतं होती. मात्र आजचा निकाल पाहता, राष्ट्रवादीने प्रत्येक विरोधी पक्षात सुरुंग लावत, त्यांची मत आपल्या बाजूला वळवली.
या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 36 नगरसेवक असून मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.
विधानपरिषद निवडणूक निकाल