पुणे : निवडणूक आचारसंहितेचा फटका म्हाडाच्या सोडतीला बसला आहे. पुण्यातील म्हाडाच्या घरांची 24 नोव्हेंबरला होणारी सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. सासवडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे म्हाडाने पुणे विभागातील आठ ठिकाणच्या सोडती निवडणुका होईपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर पुढील तारीख जाहीर केली जाईल.

म्हाडाने आठ योजनांअंतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 2503 सदनिका आणि 67 भूखंडांची लॉटरी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. या सोडतीसाठी 31 हजार 10 अर्जदार पात्र ठरले होते. म्हाडाने या पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर केली.

मोरवाडी पिंपरी, महाळुंगे, वानवडी, सासवड, दिवे, शिवाजीनगर, सोलापूर, एसपीए सोलापूर आणि वाठार निंबाळकर सातारा या ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती होणार आहेत. सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे एसएमएसद्वारे सर्व अर्जदारांना कळवण्यात आले आहे.

म्हाडाने 5 सप्टेंबरला ही सोडत जाहीर करुन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. पुणे विभागातील ही घरांची सर्वांत मोठी सोडत असल्याचं म्हटलं जातं.