पुणे : अलीकडे आलिशान लग्नाची नवी परंपरा सुरु होत असताना पुण्याच्या पुरंदरमध्ये पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वऱ्हाड नेण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ एक दोन नाही तर तब्बल 51 बैलगाड्यांतून हे वऱ्हाड लग्न कार्यालयात पोहोचलं.


पुरंदरच्या नारायणपूरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. नारायणपूरच्या बाजीराव बोरकरांचा मुलगा नाथसाहेब आणि शिवरीतल्या पंढरीनाथ कदमांची मुलगी स्वाती यांचा विवाहसोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

गाड्यांनी होणारं प्रदूषण टाळण्यासाठी वर पित्याने चारचाकींऐवजी बैलगाड्यातून वऱ्हाड मंगल कार्यालयावर नेलं. घरातल्यांसोबतच येणाऱ्या पाहुण्यांनाही स्वतःची बैलगाडी घेऊन या, असं निमंत्रण देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सर्वांनीच बैलगाडीचं निमंत्रण स्वीकारत बैलगाड्या हजर केल्या.

बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरुन गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगरं लावली होती. नवरदेव, मित्रमंडळी आणि वऱ्हाड गाडीत बसवून लग्न सोहळ्यासाठी प्रस्थान केलं.

बाजारपेठेतून एकामागोमाग एक जाणाऱ्या या 51 बैलगाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.

पाहा व्हिडीओ