मुंबई : सरकारने काल शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केल्यानंतर आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. संघर्षयात्रेमुळं कर्जमाफी झाल्याचं काँग्रेसच म्हणतं आहे. तर कर्जमाफीच्या श्रेयासाठी मुंबईतही शिवसेनेची पोस्टरबाजी पाहायला मिळते आहे.


शिवसेनेची पोस्टरबाजी

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरात आणि मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेनेचे हे पोस्टर पाहायला मिळत आहेत.

संघर्ष यात्रा आणि शेतकरी संपामुळेच कर्जमाफी : अशोक चव्हाण

काँग्रेसनंही आता कर्जमाफीवरुन श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे. “काँग्रेसह इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत काढलेल्या संघर्षयात्रेमुळे आणि शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकार दबावाखाली आले. त्यामुळेच कर्जमाफी करण्यात आली.”, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवाय, “जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश जारी करत नाहीत, तोपर्यत कर्जमाफी केवळ घोषणाच म्हणावी लागेल.”, असेही अशोक चव्हाण म्हणाले.