Sushama Andhare In Kolhapur : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुरुंदवाड महाप्रबोधन यात्रेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्ला एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला.


त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? मग एवढं कशासाठी बोलता? रिक्षाचालक सांगता, तर शेतकरी मध्येच कोठून आणला? तुम्ही जे सांगता ते, तरी लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या मुलाने जरुर मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण गरीब शेतकऱ्याच्या. एकनाथ भाऊ तुम्ही गरीब शेतकरी आहात का? मुंबईतून जाताना स्पेशल चॅर्टर विमानाने जाता. असा कोणता शेतकरी आहे दाखवा जो चॅर्टरने आपल्या शेतात जातो? एबीपी माझाने याबाबत स्टोरी केली होती. तो माझ्याकडे आता नाही, मी तुम्हाला दाखवतो. त्या पुढे म्हणाल्या एवढं मोठं घर बांधता, रिसाॅर्ट बांधता मग गरीब शेतकरी कसा काय असू शकतो? तुम्ही घराणेशाहीवर बोलता, तर तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात का आणले? 


तत्पूर्वी, व्हिडिओ दाखवल्यानंतर सुषमा अंधारे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केलं आहे. देवेंद्र फडणवीस द्वेषमुलक राजकारण थांबलं पाहिजे म्हणतात, पण काहीच करत नाहीत. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसारखी अमराठी माणसं महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. भाजपचा मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखत आहे. कुलदीप सेंगलसारख्यांना वाचवणारी हीच होती. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचे सांगतात, पण हाथरसमध्ये तरुणीचे रात्रीत अंत्यसंस्कार केले हे कोणते हिंदुत्व सांगतात? अशी विचारणा त्यांनी केली. सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला. राहुल शेवाळे यांचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नारायण राणे यांची मुले मातोश्रीबद्दल बोलतात, पण कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली नाही. गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, बिल्किस बानो असेल यांच्यावरून महिलांना हे लोक किती तुच्छतेने पाहतात ते दिसते. एकनाथ भाऊ निर्णायक पदावर नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटची बाहुली आहेत. त्यांनी रिमोट चालू केला बोलतात, बंद केला ते थांबतात. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत. 


संजय राऊतांची जागा सुषमा अंधारे यांनी भरून काढली


व्यासपीठावर आगमन होताच सुषमा अंधारे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना डाॅ. सुजित मिणचेकर यांनी उल्हास पाटील यांचा आमदार असा उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यांना माजीचे आजी करण्याची जबाबदारी आपली आहे. मला सुषमा अंधारे यांच्या गाडीचे सारथ्य करण्याची जबाबदारी मिळाली हे भाग्य समजतो. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिक आहे त्याच ठिकाणी आहे. अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते कधी मिणचेकर जातोय याची वाट पाहत होते, पण डाॅक्टरला आमदार उद्धव ठाकरेंनी केले तो त्यांच्याच पाठिशी राहिल. संजय राऊतांची जागा सुषमा अंधारे यांनी भरून काढली. घरातील स्त्रियाही काम धाम मालिका सोडून सुषमा अंधारे काय बोलणार आहेत याकडे लक्ष असते असेही ते म्हणाले. 


उल्हासदादा पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, काळाची गरज म्हणून सुषमा अंधारे यांनी बोलणं आवश्यक आहे. त्यामुळे मी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. आमदार होताना जे बोललो ते सर्व करून दाखवलं. मात्र, 2019 मध्ये पराभव झाला. मात्र, सर्व खंबीरपणे उभे आहेत. आम्ही विकासकामे केली, पण लोकार्पण करता आले नाही. 


तुमचा गेम केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत


जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, उल्हासदादा पाटील तुम्ही आमदार होणार आहेत. सुजित मिणचेकरही त्यांच्या मांडीला  मांडी लावून सभागृहात असतील. धैर्यशील माने तुम्हाला माजी खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आईने गद्दारी केल्यानंतर यांनीही केली. तुमचा गेम केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. यड्रावकर यांचेही डिपाॅझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. गावागावात आम्ही फिरणार आहोत. बाळासाहेबांचे कोणते विचार तुम्ही घेऊन चालला आहात? अशी विचारणा त्यांनी शिंदे गटाला केली.


इतर महत्वाच्या बातम्या