Pune Crime news : पुण्यात झालेल्या तरुणीवरील हल्ल्याने महाराष्ट्र हादरला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केला मात्र लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाच्या धैर्याने तरुणी थोडक्यात बचावली. हा तरुण नसता तर तरुणीचा जीव गेला असता. याच तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानचं महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. सामान्यांपासून तर राजकारणी लोकांपर्यंत सगळ्यांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. अशाच धाडसी तरुणांची सध्या राज्याला गरज असल्याचं बोललं जात आहे.
जितेंद्र आव्हाडांकडून 51 हजारांचं बक्षीस
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन लेशपालचं कौतुक केलं आहे. त्यांनी यांना 51 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल...!!
मनसैनिकांनो धावून जा- राज ठाकरे
राज ठाकरे यांनीदेखील या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. सोबतच लेशपालचं कौतुक केलं आहे, ते लिहितात की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं. दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.
हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. तसंच लेशपालचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, पुणे शहरात भररस्त्यात तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला अडवून त्या मुलीचे दोन धाडशी तरुणांनी प्रसंगावधान राखून प्राण वाचवले. या तरुणांनी दाखविलेले धाडस अतिशय कौतुकास्पद आहे. मुलीवर प्राणघातक हल्ला होत असताना आपल्या प्राणाची पर्वा केली नाही.त्यांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन. राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, पुणे शहर व परिसरातील कोयता घेऊन हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे त्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका.
लेशपाल, तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते-रुपाली चाकणकर
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील लेशपालचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, लेशपाल ,आज तुझ्यामुळे एक जीव वाचला, तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे.
पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही- अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.
हेही वाचा-