Pune RTE lottery : आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत उद्या पार पडणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार 2023-24या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
राज्यातील सुमारे 1 लाख 1 हजार 969 जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख 64 हजार 472 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल. तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले. राज्यातील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 65 हजार 258 म्हणजेच प्रवेश क्षमतेच्या तीन पटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याला लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या सर्व पालकांना उद्याची प्रतिक्षा आहे. मुलांच्या उत्तर भविष्यासाठी प्रत्येक पालक या सोडतीकडे डोळे लावून बसले आहे.
8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा उपलब्ध
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right To Education Act) खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 1 मार्चपासून सुरुवात झाली. तर ऑनलाईन अर्जांसाठी अंतिम मुदत 25 मार्च होती. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सर्वाधिक आरटीई प्रवेशाच्या जागा पुणे जिल्ह्यात असून यंदा प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील आरटीईच्या 15 हजार 655 जागांसाठी 77 हजार 550 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.