Amravati Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या नव्या वादासाठी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर कारणीभूत ठरले असून विरोधकांनी त्यांच्या जन्मतारखेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी दोन जन्म दाखल्यावर दोन भिन्न तारीख दिली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद आधीच सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.  नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायलयाने रद्द केले होते. त्याविरोधात राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जन्मतारखेवर प्रश्न उभे केले आहेत. खराटे यांनी आज पत्रकार परिषदे घेत राणा यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसा निमित्ताने अमरावतीमध्ये 'हिंदू शेरणी' असे मोठे बॅनर लागले आहे. या बॅनरवर 6 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि नवनीत राणा यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामूहिक हनुमान चालिसाचे वाचन करणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र, 6 एप्रिल रोजी खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस असेल तर त्यांची जात ही "शीख" आहे. तसा उल्लेख त्यांच्या जन्म दाखल्यावर असल्याचे खराटे यांनी म्हटले. तर, ज्या जन्माच्या दाखल्याच्या भरोवशावर त्यांनी लोकसभा लढवली ती "मोची" जातीच्या टीसीवर जन्म तारीख 15 एप्रिल 1985 आहे. त्यामुळे त्यांची कोणता जन्म दाखला खरा आहे? असा सवाल त्यांनी केला. 


नवनीत राणा यांचा 6 तारखेला वाढदिवस असेल तर मग तुम्ही "शीख" आहेत का? मग तुम्ही मागासवर्गीय मतदार संघातून निवडणूक कशा लढल्या असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी उपस्थित केला आहे.


मुस्लिम मतेदेखील मिळाली


खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या बॅनरवर 'हिंदू शेरणी' असा उल्लेख केला आहे. मात्र, त्या मुस्लिम लोकांच्या विश्वासावर निवडून आल्या. त्यांनी ते मान्यही केलं होतं, मग आता हिंदुत्वाचा पहेराव कडून स्वतःला हिंदू शेरणी म्हणत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले.


बोगस जात प्रमाणपत्रावरून मुंबईतील शिवडी दंडाधिकारी सुनावणी सुरू आहे. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती


अमरावतीच्या (Amaravti) खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती