पुणे: राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. आज, 16 जून रोजी पुणे ते कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 32.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. यासोबतच पुणे शहर आणि चिंचवड परिसरात अनुक्रमे 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासांत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरीही घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'खडकवासला'च्या पाणीपातळीत वाढ
शहराच्या धरणसाखळीत पावसाचा जोर वाढला आहे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाऊस पडत आहे. मागील 24 तासांत खडकवासला धरणात 18 मिमी, पानशेतमध्ये 25 मिमी, वरसगावमध्ये 26 मिमी आणि टेमघरमध्ये 23 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सद्यः स्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये 5.25 टीएमसी पाणीसाठा असून, हा पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा 1.35 टीएमसी इतका जादा आहे. लोणवळ्यात गेल्या 24 तासांत 143 मिमी पाऊस कोसळला
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो
पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या तीन दिवस तुफान पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांत ही 143 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदा आत्तापर्यंत 791 मिमी पाऊस कोसळला आहे, गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ 303 मिमी पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 488 मिमी अधिकचा पाऊस बरसल्यानं यंदा भुशी धरण लवकर ओसंडून वाहू लागला आहे.
राज्यात मुसळधार पाऊस; 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तर मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून पुन्हा हजेरी लावली असून, मुंबई, ठाणे, वसई, कल्याण परिसरात पावसाने जोर धरला आहे. आज, 16 जून रोजी सकाळपासूनच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई लोकल वाहतूक पूर्ववत सुरु असली तरी, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. वसई-विरार भागात रविवारीपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवस रिमझिम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील 22 जिल्ह्यांना विविध अलर्ट
रेड अलर्ट: रत्नागिरी
ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार
यलो अलर्ट: मुंबई, नाशिक, आहिल्यानगर, जळगाव
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत अलर्ट नसलातरी, घाटमाथ्यांवर पावसाचा जोर दिसून येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.