Pune: पुणे पोलिसांनी खराडी येथील फ्लॅटवर टाकलेल्या धाडीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री झालेल्या या कारवाईत पोलिसांनी कोकेन, गांजा, हुक्का, दारू या अमली पदार्थांसह काही साहित्यही जप्त केलं. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना झालेल्या अटकेमुळे मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांसह प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर पाचही आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तर आरोपी प्रांजल खेवलकर यांचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी हे राजकीय षडयंत्र असून पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले असल्याचा युक्तीवाद केलाय.
सुनावणीत नेमकं काय झालं?
रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी भागातील स्टेबर्ड अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह दोन महिला व तीन पुरुषांना अटक करण्यात आली. यावेळी पुणे पोलिसांनी 42 लाख रुपयांसह अंमली पदार्थ जप्त केले. खराडी पोलीस ठाण्यात या संदर्भात नडीपीएस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) (11) अ, 21 (ब), 27 कोटपा 7 (2), 20 2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल पिंगळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) यांनी या कारवाईची माहिती दिली. पुढील तपास सुरु असल्याचंही सांगण्यात आलं. दरम्यान, सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. तपास अधिकारी वेळेत न पोहोचल्यानं न्यायाधीश चेंबरमध्ये निघून गेले. सुनावणी उशीरा सुरु करण्यात आली. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सातही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद काय?
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच पुरुष व दोन महिलांना अटक करण्यात आली.
प्रांजल मनिष खेवलकर(41)
निखिल जेठानंद पोपटाणी (35)
समीर फकीर महमंद सय्यद (41)
सचिन सोनाजी भोंबे (42)
श्रीपाद मोहन यादव (27)
ईशा देवज्योत सिंग (22)
प्राची गोपाल शर्मा (22)
अशी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे असून यात निखिल पोपटानी, समिर सय्यद आणि एका महिलेला नशा करण्याची सवय असल्याचं सरकारी वकिलांनी नमूद केलं. सरकारी वकिलांनी या प्रकरणाची माहिती न्यायाधिशांना देताना ' रेव्ह पार्टी ' हा शब्द वापरला. मात्र न्यायाधिशांनी रेव्ह पार्टी हा शब्द वापरु नये असं म्हटलं. अटक केलेल्या आरोपींनी अंमली पदार्थ कुठुन आणले याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली.सरकारी वकिलांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा युक्तीवाद काय?
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय षडयंत्र असल्याचं वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितलं. आरोपींनी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले असावेत. आमच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
'पोलीस साध्या वेशात येऊन गेले, पोलिसांनीच सगळं केलं असावं'
'प्रांजलला या अगोदर तीन वेळी अडकवण्याचा प्रयत्न झाला.यातील एक ही कलम लागू होत नाही.पोलिस गेले, पोलिसांनी व्हिडीओ शूटिंग केलं. यावर कारवाई झाली पाहिजे. कशासाठी कोठडी द्यावी कारणं द्यावे. यातील काही जण गुन्हेगार आहे म्हणून कोठडी का द्यावी. CCTV फुटेज आहे आमच्याकडे. मला अडकवायचे होते त्यासाठी एवढं केलं का? पोलिसांनी अगोदर पाहणी केली का? या ठिकाणी काही अमली पदार्थ आढळून आले, पण कुठे दुसरीकडे मिळून आला. गुन्हा जामीन होऊ शकतो. राजकीय द्वेषातून हे होत असेल तर चुकीच आहे. धूळफेक करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे.यात काही रोल माझा नाही.माझ्यासमोर सुद्धा कोणी अस काही केलं नाही.पोलिसांनी हे सगळ केलं असावे असा माझा आरोप आहे.' असेही आरोपीच्या वकिलांनी सांगितलं.
'या अगोदर दोन ठिकाणी पोलिस साध्या वेशात येऊन गेले होते.माझ्याकडे एक ही गोष्ट आढळून आली नाही.एन डी पी एस बाबत खूप रोल आहेत.अंमली पदार्थ कोणाकडून आणले त्याचा तपास व्हावा.झालेल्या सगळ्या भविष्यात घडणाऱ्या घटनासाठी कशाला पोलिस कोठडी हवी आहे? असा सवालही आरोपीच्या वकिलांनी केला. हॉटेल परिसरात पोलिस येऊन गेले आहेत.सगळे घेऊन आले आहे.अमली पदार्थ कोणी घेतले कोणी आणले त्याचा तपास करावा.हे रेकॉर्डचे गुन्हेगार नाही.बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मी काही केलं नाही माझा संबंध नाही.त्यामुळे प्रांजल खेवलकर याला जामीन मिळावा.' असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला.