Pune Police : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन घटनांनंतर पुणे पोलीस (Pune Police) अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यात  पुणे पोलीस आयुक्तांनी पोलिसांना कठोर सूचना दिल्या आहेत सोबतच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत 5 अधिकाऱ्यांसह 10 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. यासोबतच अशा प्रकारच्या अनेक घटना घडू नये, यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी खबरदारी घेण्यासाठी पावलं उचलली आहे. त्यात अनेक प्रकरच्या कारवाया, सरकारकडे मागण्या आणि पोलीस प्रशासनातील कामकाजात बदलांचा समावेश आहे. यातच शहरात किमान 2500 पोलिसांची गरज असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं आहे. 


Pune Police : अल्पवयीन मुलांवरदेखील होणार कारवाई


पुण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यात कोयता गँग आणि गाड्या फोडणाऱ्या टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या पाहता आता या मुलांवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आतापर्यंत पुण्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मागील 3 महिन्यात 31 जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे आणि अनेक सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता दिसत आहे.


Pune Police : पोलिसांना कठोर सूचना


पुण्यात वाढती गुन्हेगारी पाहता अनेक पुणेकरांनी पुणे पोलीस नक्की काय करत आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलीसांवर देखील कारवाई होणार आहे. 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


Pune Police : पुण्यातील शाळा कॉलेजमध्ये होणार समुपदेशन


सगळ्या गुन्हांमध्ये अल्पवयीन मुलांचा किंवा महाविद्यालयीन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशनाचे वर्ग घेतले जाणार आहे. यात काही पोलीस आणि पुण्यातील काही NGO चा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करुन देण्यात येणार आहे, शिवाय कोणत्या गुन्ह्यावर कोणती शिक्षा होऊ शकते याचीही माहिती दिली जाणार आहे.  


Pune Police : पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज


पुण्याची लोकसंख्या 60 लाख आहे. पुण्यात आता एकूण 9500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र 12,500 पोलिसांची गरज आहे. त्या तुलनेत शहरात आता 2500 पोलिसांची गरज आहे. त्यामुळे शहरात एक झोन, 7 नवे पोलीस स्टेशन आणि 1 पोलीस उपायुक्तांची मागणी आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली आहे. 


हेही वाचा-


Pune Crime news : शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात; पाच महिन्यांत 7 कोटी 24 लाखांचे ड्रग्ज जप्त