Pune Crime news पुणे शहराची वाटचाल स्मार्ट (Pune Crime news) सिटीकडे होत आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती यामुळे मुंबईपाठोपाठ अमली पदार्थ तस्करांचे पुणे हे लक्ष्य आहे. मात्र असे असतानाच अमली पदार्थ तस्कारांना पुणे पोलिसांनी कारवाईने चोख उत्तर दिले आहे. 


भारत देश हा 2047 पर्यंत अमली पदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी अशा तस्करांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेऊन मागील दीड वर्षात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मागील दहा वर्षांत जेवढी कारवाई करण्यात आली होती तेवढी मागील दीड वर्षांच्या काळात करण्यात आली आहे. 


2019 ते 2021 या तीन वर्षांत पुणे पोलिसांनी 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. मागील दहा वर्षांच्या तुलनेत पाच महिन्यांत सर्वाधिक म्हणजे 7 कोटी 24 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. साडेपाच वर्षांत 22 कोटी 17 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगर सारखे अमली पदार्थ जप्त केले आहे. 


Pune Crime news : नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर


पुणे शहरात अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर असल्याचे दिसून येते. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी ते पुण्यात करतात. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजेवाडी येथील उच्चभू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्याची ग्राहकांना विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.


Pune Crime news : मोठी कारवाई; 10.5 लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त


पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मंगळवारी भवानी पेठ परिसरातून एका 25 वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून 10 लाख 40 हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला.  संशयित मुजाहिद अन्वर शेख हा त्याच्या राहत्या घरातून व्यसनाधीनांना अंमली पदार्थाचा पुरवठा करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


अंमली पदार्थ विरोधी सेल-2 आणि समर्थ पोलिसांचे पथक अंमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी गस्तीवर होते. भवानी पेठेतील गोल्डन सिटी येथे राहणारा शेख हा मेफेड्रोनचा पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी एका डमी ग्राहकाला शेखच्या घरी मेफेड्रोन खरेदी करण्यासाठी पाठवले आणि त्याच्याकडून 52 ग्रॅम औषध आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला.