Pune News : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील (Pune) पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. खडकवासला (Khadakwasla dam) धरणात सध्या 51 टक्के पाणीसाठा आहे. मात्र खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होईपर्यंत आणि त्याचे दरवाजे उघडेपर्यंत पुण्यातील पाण्याचे निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना अजून काही दिवस पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाच्या अपेक्षेने महाराष्ट्र राज्य सरकारने पुणे महापालिकेला उन्हाळ्यात पाणी वाचवण्याच्या सूचना दिल्या. धरणातील पाणी 31 ऑगस्टपर्यंत वापरता येईल याची खात्री करण्यासही त्यांना सांगण्यात आले. परिणामी, पीएमसीने पाणीगळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आणि पाणीकपात लागू केली. 18 मे पासून दर गुरुवारी पाणीकपात करण्यात आली आहे परिणामी किमान 0.25 टीएमसी पाण्याची संभाव्य बचत होऊ शकते.
दर गुरुवारी होणाऱ्या पाणी कपातीमुळे जवळपास 20 टक्के भागात शुक्रवार आणि शनिवारी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या समस्येबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी केल्या आहेत. यावर उपाय म्हणून जलवाहिनीतील हवेचा दाब कमी करण्यासाठी 150 हून अधिक एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. या उपायामुळे अनेक भागात पाणीपुरवठा सुधारला आहे.
जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी पाऊस झाला आहे. जुलैमध्ये डोंगराळ भागात (घाट) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असतानाही अद्यापही एवढा पाऊस पडू शकलेला नाही. आज (12 जुलै) सकाळपर्यंत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला आहे. एकट्या खडकवासला धरणात 1.03टीएमसी (52.51 टक्के) पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दर गुरुवारी असलेले पाण्याचे निर्बंध उठवले जातील, असं म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत बऱ्यापैकी पाऊस होत नाही आणि धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नाही तोपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. वरिष्ठ स्तरावर चर्चा करून योग्य वेळी पाणी निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या काळात पावसाची गरज आहे. सरासरी पाऊस झाला की धरणाच्या पातळीत वाढ होईल आणि पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असंही सांगण्यात आलं आहे.
कोणत्या धरणात किती पाणी साठा?
खडकवासला-52.51 टक्के
पानशेत-28.11 टक्के
वरसगाव-27.11 टक्के
टेमघर- 15.15 टक्के
हे ही वाचा-