Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळ (sharad mohol) याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता अनेकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र पत्नीच्यामार्फत भाजपमधून राजकारणात उतरणारा शरद मोहोळ कोण?
 
या पक्ष प्रवेशानंतर कुख्यात गुंड शरद मोहोळ याची चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या काळात निवडणुका आहे. त्यात भाजपला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची मदत होऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलं आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं वर्चस्व हे पुण्यातील कोथरुड परिसरात आहे. त्यात परिसरात चंद्रकांत पाटील आमदार आहेत. त्यासोबतच मुरलीधर मोहोळदेखील याच परिसरात राहतात. आगामी निवडणुकांसाठी शरद मोहोळ यांची नेत्यांना गरज भासू शकते. यामुळे हा प्रवेश केला गेला असावा, अशा चर्चा आहे. पुण्यातील गुंडांना पाठीशी घालणं आणि त्यांना राजकारणात सक्रिय करणं यामध्ये भाजपदेखील आता मागे नाही आहे, हे दिसून येत आहे. 


कोण आहे शरद मोहोळ?


शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला.  मात्र बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरु केलं. खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं. मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळने स्वतःच्या पत्नीच्या मार्फत राजकारणात उतरायचं ठरवलं आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे. त्यामुळे कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शरद मोहोळचा त्यांना फायदा होईल, असं बोललं जात आहे.