पुणे : या आधी राज्यात कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होते, आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. दौंड तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. पांडुरंग आबाजी राऊत यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


नितीन गडकरी म्हणाले की, "देशात साखर गरजेपेक्षा जास्त आहे. ब्राझिलमध्ये दुष्काळ पडला म्हणून आपल्याकडील साखर कारखानदार आनंदी झाले. पंतप्रधान मोदींसमोर मी प्रस्ताव मांडला की गरिबांना आपण साखर स्वस्त देऊ. मग साखरेची किंमत 32 रुपये केली. मात्र तरीही पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी नाईलाजास्तव कमी दरात साखर विकली. उसाचे उत्पादन आपण थांबवू शकत नाही. आधी कापूस शेतकरी आत्महत्या करीत होते, आता साखर कारखाना संचालक आणि शेतकरी उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील. त्यावर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणाले, बघा गडकरी काय म्हणता आहेत ते."


नितीन गडकरी म्हणाले की, "मी राज्यात भाजपचं काम करायचो. त्यावेळी या साखर कारखान्याची माहिती मिळाली. त्यावेळी लायसन्स राज होतं. त्यामुळं विरोधकांना लायसन्स मिळेल अशी शक्यता नव्हती. आमच्या सत्तेच्या काळात या कारखान्याला परवानगी मिळाली. विदर्भात मी तीन कारखाने चालवतो ते आता फायद्यात आहे. हे मात्र क्षणिक आहे. ज्यांना सहकारी साखर काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो. साखर कारखाने काढणं अवघड होतं. संघाच्या माणसाने कारखाना काढला आणि चालवला याचा जास्त आनंद आहे. संघाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. संघाचे संस्कार हीच आमच्या जीवनाची पुंजी आहे."


निर्यात वाढली पाहिजे, हा आर्थिक राष्ट्रवाद
आर्थिक राष्ट्रवादाची देशाला गरज असल्याचं सांगत गडकरी म्हणाले की, "भारताला लागणारी आयात कमी झाली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे असं गडकरी म्हणाले, ते म्हणाले की, नागपूरमध्ये सीएनजी एलएनजीचा पंप चालू केला. आता एलएनजीचा ट्रक देखील येणार आहे. एकावेळी तो 1400 किलोमीटर जातो. डिझेल पेट्रोलपासून प्रदूषण जास्त होत आहे. भारताला लागणारे इम्पोर्ट कमी झाले पाहिजे आणि एक्स्पोर्ट वाढले पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे हा आपला आर्थिक राष्ट्रवाद आहे. येणाऱ्या काळात इम्पोर्ट कमी करायची असल्यामुळे ईथेनॉलची निर्मिती वाढवावी लागणार आहे. आगामी काळात आज आहे त्यापेक्षा दुप्पट ईथेनॉल लागणार आहे."


विमान बिघडले तर जबाबदारी तुझी...
गडकरी एक किस्सा शेअर करताना म्हणाले की, "बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बायोमास तयार करणार आहे. वाहनविषयक कायदे करणे माझ्याच हातात आहे. सगळ्यांनी प्रेमानं ऐकलं तर ठिक, नाहीतर कसं करुन घ्यायचं ते मला माहित आहे. स्पाइट विमान आम्हाला डिझेलवर चालवायचं होत. तेव्हा त्या विमान मालकाला फोन केला. त्यावेळी तो म्हणाला, विमान बिघडले तर जबाबदारी कुणाची? मी म्हणालो जबाबदारी तुझी. तुझी 10 काम केली, एक रुपया घेतला नाही. त्यामुळे तुझे एक विमान खराब झालं म्हणून काय होत नाही."


शेतकऱ्यांना माझी विनंती आहे डिझेल आणि पेट्रोलची गाडी विकत घेऊ नका. शेतकरी सुखी झाला पाहिजे हाच संघाचा आर्थिक राष्ट्रवाद आहे. गाड्या कन्व्हर्ट करायच्या. आधी ट्रॅक्टर कन्व्हर्ट करा. इकडे पेट्रोलचे बोर्डच दिसले नाही पाहिजे. आधी ईथेनॉल पेक्षा पेट्रोल जास्त अॅव्हरेज देत होते अशी कंपनीची ओरड होत होती. त्यावर आता आम्ही काम केलं आणि आता पेट्रोल एवढच ईथेनॉलची गाडी अॅव्हरेज देते. साखरचे उत्पादन कमी करा आणि ईथेनॉल वाढवा. त्याशिवाय कारखाने वाचणार नाहीत. येणाऱ्या काळात जलव्यवस्थापनाला महत्व आहे. आगामी काळात ग्रीन हायड्रोजनला महत्त्व येणार आहेत. आता आपण ऊर्जेला आयात  करणारा नाहीतर निर्यात करणारा देश झाला पाहिजे


जात पंथ याचा आधारावर राजकारण करायचे नाही. पक्षाचा विचार न करता आपण जे बरोबर आहे ते बरोबर , आणि चूक आहे ते चूक आहे ही भूमिका घ्यायची, यालाच म्हणतात 'सबका साथ आणि सबका विकास', असं नितीन गडकरी म्हणाले. 


विवेकानंद म्हणयाचे की 21 शतक हे भारताचे असणार आहे. जेव्हा सगळी लोक काम करतील तेव्हा भारत महासत्ता होईल असं गडकरी म्हणाले.