पुणे : पुण्यातील कात्रज कोंढावा रस्त्यावर मागील (Katraj Kondhwa road) काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. त्यात मागील 15 दिवसांत तिघांचा जीवही गेला होता. हा रस्ता नीट करा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार, महावितरणकडून कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून 50 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्यानं रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.
पालकमंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या.
वाहतूक नियंत्रणासाठी 50 पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली आहे. वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी दोन्ही यंत्रणांचे अभिनंदन केले असून महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
अपघात सत्र कधी थांबणार? नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया
कात्रज कोंढवा रस्त्यावरील अपघाताचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी ट्रकने दिलेल्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. कोंढव्यातील स्मशानभूमी जवळ हा अपघात झाला असून कधी भूसंपादन व्हायचे? कधी निधी यायचा? कधी रस्ता रुंदीकरण होणार? आणखी किती बळी हवेत? अपघात सत्र कधीच थांबणार? कात्रज कोंढवा रस्तावर प्रवास करायचा का नाही? यासह असंख्य प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात होते. त्यानंतर स्थानिक प्रतिनिधींकडे तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी थेट रस्त्याची पाहणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी 50 पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती केली आहे.