Pune Accident News :  मुंबई एक्स्प्रेसवेवर (mumbai pune expressway) अपघातांच सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे. गुरुवारी (6 ऑक्टोबर) दुपारी पाचच्या सुमारास पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर आणि टवेरा गाडीचा अपघात (Accident) झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला मोठी इजा झाली नाही. मात्र अपघातग्रस्त वाहने मार्गाच्या मधोमध असल्याने सायंकाळच्या सुमारास मुंबईकडे जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. दरम्यान पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाहनं मार्गाच्या मधून बाजूला करुन वाहतूक खुली करण्यात आली. या अपघातामुळे बोरघाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता 7.30 वाजेच्या सुमारास या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने असल्याची माहिती आहे. 


मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो, मात्र त्याच तुलनेत या मार्गावर अपघाताची मालिकादेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे.