Pune Metro : पुणे मेट्रोच्या कामासाठी (Pune Metro) येरवड्यातील (yerwada) पर्णकुटी चौकात 6 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकीत (Traffic Diversion) बदल करण्यात येणार आहेत. येरवड्यातील पर्णकुटी चौकात मेट्रो मार्गावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. येरवड्यातील सादलबाबा चौकातून पर्णकुटी चौक ते कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.


मेट्रोचं काम जोरात सुरु आहे त्यामुळे 6 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. नागरिकांनी सादलबाबा चौक, तारकेश्वर चौक, पर्णकुटी चौक, गुंजन चौकातून पर्णकुटी चौकाकडे उजवे वळण घ्यावे. तिथून वाहनधारकांनी कोरेगाव पार्ककडे डावीकडे वळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.


येरवडा परिसरत मेट्रोचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या काळात या मार्गावरील मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. मेट्रोचा हा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरु आहेत. त्यामुळे गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री प्रवास करताना खबरदारी बाळगण्याची गरज आहे. 


पुण्यात झपाट्याने मेट्रोचा विस्तार 


पुणे महामेट्रोकडून खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा आराखडा महापालिकेकडे (PMC) सादर केला आहे. या मार्गासाठी 8 हजार 565 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. या आराखड्यात खडकवासला ते स्वारगेट-हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे. या मार्गावर किमान 22 स्थानकं असणार आहे. खडकवासला-सिंहगड रस्ता-स्वारगेट-शंकरशेठ रस्ता-राम मनोहर लोहिया उद्यान-मुंढवा चौक-खराडी असा मार्ग असेल. संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड होणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेसमोरुन गणेश कलाक्रीडा मंचासमोरुन जेधे चौक, शंकरशेठ रस्त्याने पुढे जाणार आहे. 


लवकरच गरवारे ते डेक्कन मेट्रो धावणार
पुणे मेट्रोने फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत रीच 1 आणि गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशनपर्यंत पहिली चाचणी पूर्ण करुन आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. या चाचणीला मोठे यश मिळाले. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे दिवाणी न्यायालयाकडे आणि फुगेवाडी येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.