Mukta tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta tilak) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1992 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. नगरसेवक, महापौर आणि नंतर त्या पुण्याच्या कसब्यातून आमदार अशी कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


भारतीय जनता पार्टीच्या ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या, विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला आहे. 


वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय सुधीर मुनगंटीवार...


मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे एका निष्ठावान कार्यकर्तीला आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.


पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
कसबा मतदारसंघाच्या  आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात  शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.



विरोधी पक्षनेते अजित पवार...
पुण्याच्या माजी महापौर, कसबा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 1992 पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण होती. पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक जीवनाशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. आमदार म्हणून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.