Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil News) यांना नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.  त्यांना विधीमंडळ परिसरात देखील बंदी घालण्यात आली आहे. अर्थातच आता या अधिवेशनापुरता जयंत पाटील यांचा 'करेक्ट कार्यक्रम' झाला आहे. 


जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषच केल्याचं पाहायला मिळालं. पायऱ्यांवर सुरू असलेल्या विरोधकांचे आंदोलनात जयंत पाटील बसले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 'आठ दिवस असेच जातील जयंत पाटील पुन्हा येतील...' 'हम मे है दम,करेक्ट कार्यक्रम करेंगे हम' अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.


जयंत पाटलांना खांद्यावर घेत विधीमंडळ परिसरात मिरवणूकच काढल्यासारखं चित्र दिसून आलं. शिवाय निलंबनाच्या घोषणेनंतर जयंत पाटलांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय...! असं दोन ओळींचं ट्वीट जयंत पाटलांनी केलं आहे.  मला निलंबित केलं तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचं ते म्हणाले. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. 


इकडे सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करतो, जयंत पाटलांचं निलंबन मागे घ्या, अशी विनंती केली मात्र अध्यक्षांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. 






नेमकं काय घडलं...


आज सकाळच्या सत्रात विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील सभागृहात संतापले. या संतापात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.  हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभर आंदोलन... 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्याचे निलंबन करुन हुकुमशाही पध्दतीने सभागृह चालवणार्‍या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ उद्या 23  डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.


ही बातमी देखील वाचा


जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन; अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात