Pune MHADA Lottery : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर (Pune Solapur Kolhapur MHADA Lottery) जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार घरांची लॉटरी आज निघणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5,211 घरांसाठी म्हाडाकडून आज ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली आहे. 


पुणे विभागांतर्गत म्हाडाच्या 5 हजार 211 घरांसाठी 90 हजार 81 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पाटील यांनी दिली. यापैकी 71 हजार 742 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. या सोडतीमध्ये पुणे विभागात म्हाडाच्या विविध योजनांतर्गत 279 घरे, प्रथम प्राधान्याच्या धर्तीवर 2 हजार 845 घरे आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 हजारांच्या वर घरांची लॉटरी काढण्यात आली होती.


सदनिकांच्या विक्रीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला होता. 


सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 1945 सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 575 सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत 1370 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 279 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2 हजार 675 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  


सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले होते. 


9 जून, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली होती. 9 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार होती. या लॉटरीसाठी 80 हजारांहून अधिक अर्ज आले होते. या लॉटरीला भरभरुन प्रतिसाद मिळाला असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे.