पुण्यातल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि मेपलच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मेपल ग्रुपनं सर्व ग्राहकांना पैसे परत करणार असल्याचं सांगितलं आहे. या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर आता मेपल ग्रुपच्या कार्यालयाभोवती पैसे परत घेणाऱ्यांचा गराडा पडला आहे.
मात्र, तब्बल 38 तासांनंतरही मेपल ग्रुपचा संचालक सचिन अग्रवाल अजूनही बेपत्ता आहे.
खरंतर मेपल ग्रुपला नागरिकांचे पैसे परत करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपासून मेपल ग्रुपने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. मात्र, आता अटक टाळण्यासाठी मेपल ग्रुपने नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.
मेपल ग्रुपने आज दुपारपासून ‘आपलं घर’ योजनेत घर बुक केलेल्या नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे ‘आपलं घर‘ योजना?
गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये ‘आपलं घर’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे.
जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.