एका नायझेरीयन व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर 2 हजार कोटी किमतीच्या या ड्रगचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. मात्र आणखी मोठे मासे अजून गळाला लागण्याची शक्यता आहे.
ड्रग्ज प्रकरणाचे सोलापूरशी धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी धानेश्वर राजाराम स्वामीला अटक केली. चौकशीतून राजेंद्र डीमरी नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. पोलिसांनी पुण्यातून स्वामीला अटक केली. त्याच्याकडे साडेपाच किलो इफेड्रीन सापडलं. त्यानंतर पोलीस सोलापुरातील त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचले.
अव्होन ऑर्गनिक्स, अव्होन मेडिसायन्सेस आणि अव्होन लाईफ सायन्सेस अशा वेगवेगळ्या नावाने कार्यरत असलेल्या सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतली एक वादग्रस्त कंपनी. सुरुवातीपासूनच या कंपनीतल्या उत्पादनावर संशयाने पाहिलं जायचं. अखेर १५ एप्रिल २०१६ रोजी ठाणे आणि अहमदाबाद पोलिसांनी मारलेल्या छाप्यात या कंपनीच खरं रूप समोर आलं.
औषध निर्मितीच्या नावाखाली अमली पदार्थ बनवले जात असल्याच उघड झालं. तब्बल दोन हजार कोटींचा अमली पदार्थाचा साठा इथं सापडला.
सुरुवातीला धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोन आरोपींना जेरबंद केलं. त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सोलापूरच्या अव्होनपर्यंत येऊन पोहोचला. पण सोलापूर ते युरोप व्हाया गुजरात अशी होणारी अमली पदार्थांची तस्करी यानिमित्ताने उघडकीस आली. ठाणे अमली पदार्थ विरोधी पथक आणि अहमदाबाद एटीएसच पथक अव्होनच्या कारभाराची चौकशी करतंय. इफेड्रीनचा आणखी साठा कंपनीत असावा असा संशय तपास पथकाला आहे. तो शोधण्यासाठी प्रयत्न चालले आहेत.
पोलिसांनी 571 किलो इफेड्रीन आणि 8541 किलो सूडो इफेड्रीन ड्रग जप्त केलं. या दोन्ही ड्रग्जचा वापर कोकीन सारखं ड्रग बनवण्यासाठी वापर केला जातो.
पोलिसांनी 5 जणांना अटक केलं असलं तरी अद्याप पुनीत श्रृंगी, जय मुखी आणि काँग्रेसच्या माजी आमदाराचा मुलगा किशोर राठोडचा शोध सुरु आहे. त्यामुळं या प्रकरणातले मास्टरमाईंड पोलिसांच्या गळाला कधी लागणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.