प्रेमभंगानंतर पुण्यातील प्रियकराचा प्रेयसीच्या हॉस्टेलमध्ये गोळीबार
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2019 10:37 AM (IST)
प्रेमभंगानंतर बिथरलेल्या पुण्यातील तरुणाने प्रेयसी राहत असलेल्या वसतिगृहात जाऊन हवेत गोळीबार केला. त्यानंतर हॉस्टेलमधून उडी मारण्याचाही त्याने प्रयत्न केला
फोटो : गेट्टी इमेजेस
पुणे : प्रेमात एकमेकांसाठी जीव देण्याची भाषा करणारे प्रेमवीर नवीन नाहीत. प्रेमभंगानंतर जीव देण्या-घेण्याचा प्रयत्न करणारा प्रियकर पुण्यात पाहायला मिळाला. ब्रेकअपनंतर 23 वर्षीय प्रियकराने प्रेयसीच्या वसतिगृहात जाऊन हवेत गोळीबार केला. पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या एका वसतिगृहात हा प्रकार घडला. वसतिगृहातील तरुणीचं संबंधित तरुणासोबत प्रेमप्रकरण असल्याची माहिती आहे. मात्र दोघांचं नातं टिकू न शकल्यामुळे तरुणाचा प्रेमभंग झाला. प्रेमभंगानंतर बिथरलेला तरुण सैरभैर अवस्थेतच प्रेयसी राहत असलेल्या वसतिगृहात गेला. तिथे जाऊन त्याने तिच्यासमोर तीन वेळा हवेत गोळीबार केला. एवढं करुन तो थांबला नाही, तर त्याने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. उडी मारण्याच्या नादात तरुणाला चांगलाच मार लागला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची दखल चतुश्रुंगी पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.