मुंबई : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात जवळपास 13 हजार नागरिकांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली.


रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनावेळी रावतेंनी रस्ते अपघातांची आकडेवारी सांगितली. 2018 मध्ये 13,059 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 2016 मध्ये 12 हजार 935, तर 2017 मध्ये 12 हजार 511 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे 13 हजार जणांपैकी 80 टक्के म्हणजेच अंदाजे 11 हजार जण मानवी चुकांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मुख्यत्वे रॅश ड्रायव्हिंग हे कारण आहे. मृतांपैकी 600 टक्के नागरिक हे पादचारी, दुचाकीस्वार किंवा सायकलस्वार होते.

महाराष्ट्रात एक हजार 324 अपघतप्रवण क्षेत्रांची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने या भागांतील दोष सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

2017 मध्ये रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी 41 हजार केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. 2018 मध्ये आकडा थेट सात लाख 70 हजारांवर पोहचला. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे ई-चलान वाढल्याचं सांगण्यात आलं. राज्यात 3.41 कोटी वाहनचालक परवानाधारक आहेत.