2002 मध्ये सोळा वर्षांचा असताना निखिलची हत्या झाली होती. 2002 मध्येच त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एमआयटी कॉलेज मागील टेकडीवर पोलिसांना सापडला. पण हा सांगाडा कोणाचा आहे हे त्यावेळी पोलिसांना माहीत नव्हते.
2004 मध्ये या सांगाड्याबाबत उलगडा झाला. दुसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी निखिलच्या खुनाची कबुली दिली. त्याचा मृतदेह एमआयटी कॉलेज मागे टाकल्याचं सांगितलं. त्यावरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2006 मध्ये त्याचा निकाल लागला. आरोपी निर्दोष सुटले, मात्र निखिलचा सांगाडा पोलिसांकडे राहिला तो राहिलाच.
पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पोलिस स्टेशन आधुनिक करण्याची मोहीम हाती घेतले. त्यात मुद्देमाल कक्षाचीही सफाई हाती घेण्यात आली. त्यावेळी एका बॉक्समध्ये ठेवलेला निखिलचा सांगाडा समोर आला.
खोलीतील सामान हलवायला आलेले पोलिस कर्मचारी सांगाडा पाहून चक्रावलेच. त्यांनी लगेच वरिष्ठांना या खोक्याची माहिती दिली. त्या खोक्यावर खटला क्रमांकही लिहिला होता. खटला क्रमांकाच्या आधारे हा सांगाडा कोणाचा आहे याचा शोध लावण्यात आला. पोलिसांनी सर्व नोंदी/दफ्तर तपासात या मानवी सांगाड्याचा शोध घेतला. त्यात हा सांगाडा निखिलचा असल्याचं स्पष्ट झालं. त्यामागची कहाणी ही पुढे आली.
कशी झाली हत्या?
2002 मध्ये एमआयटी कॉलेजमागील टेकडीवर काही दिवसांपासून कुजणारा मृतदेह मिळाला होता. दोन वर्ष शोध घेतल्यानंतर तो निखिल रणपिसे नावाच्या 16 वर्षांच्या तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं होतं. लगेच त्याच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली होती. निखिलचा त्याच्याच दोन मित्रांनी खून केला होता. निखिलच्या एका नातेवाईकाच्या घरी त्यांनी चोरी केली होती. पण पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्यामुळे त्याच्या दोन मित्रांनी त्याचा खून केल्याची बाब समोर आली होती.
जेव्हा हा खटला बंद करण्यात आला तेव्हा कोर्टाने पोलिसांना निखीलच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करा असे निर्देश दिले होते. पण तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि तो सांगाडा तसाच खोक्यात पडून राहिला.
पोलिसांनी पुन्हा निखिलच्या पालकांचा शोध घेतला. ते सापडले देखील. मात्र वयोमान आणि आजारपण यामुळे ते हा सांगाडा ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ होते. पण अंत्यसंस्कार करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पोलिसांनी पालकांच्या मान्यतेने आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडत अंत्यसंस्कार केले.