लातूर : नीट परीक्षेचा निकाल लागला, मात्र अनेक विद्यार्थी नाराज झाले आहेत. हक्काचे पाच गुण कमी झाल्याने नाराज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे.

नीट परीक्षेचा उत्तर संच (आन्सर की) 29 मे रोजी घोषित करण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून त्यावर आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानंतर आज निकाल घोषित करण्यात आला. त्यासोबत उत्तरसंच देण्यात आला, मात्र त्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले आहेत.

देशभरातून 14 लाख 10 हजार परीक्षार्थींपैकी 7 लाख 97 हजार 42 जण नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्रातून सर्वाधिक 2 लाख 6 हजार 745 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 81 हजार 171 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाच गुणांचा फटका प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे बसला आहे. या विरोधात आता लातूरच्या रेणुकाई केमिस्ट्रीचे संचालक मोटेगावकर औरंगाबाद न्यायालयात दाद मागणार आहेत.

काय झाला घोळ ?

केमिस्ट्री या विषयाच्या थर्मोडायनामिक्स या पाठातील न्यूमरिकलच्या प्रश्नाचं उत्तर मागील अठरा वर्षांपासून जे देण्यात येत आहे, ज्याचा पुस्तकातही उल्लेख आहे, त्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर संचात देण्यात आलं आहे.

राजस्थानच्या नलिन खंडेलवालने 720 पैकी 701 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर महाराष्ट्रातून सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते, दिशा अग्रवाल अव्वल आले आहेत.

नाशिकचा सार्थक भट हा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला (देशात सहावा) आला. तर अकोल्याची दिशा अग्रवाल राज्यात मुलींमध्ये अव्वल (देशात 52 वी) ठरली. सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते या महाराष्ट्रातील तिघांचा देशातल्या टॉप 50 मध्ये नंबर लागतो.