Pune By election : कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड विधानसभेत (Chinchwad By-Election) पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या दोन्ही जागांवर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल की अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार यावर अनेकांच्या नजरा आहेत. त्यातच कुटुंबीय सोडले तर या जागेच्या उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छूक देखील आहेत. हे उमेदवार निवडीसाठी रोज भाजपमध्ये बैठकांंचं सत्र सुरु आहे. या बैठकीत उमेदवाराची निवड दिल्लीतून होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच चंद्रकांत पाटलांनी उमेदवारांसंदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार झाली आहे. ती यादी केंद्रीय समितीकडे आम्ही शुक्रवारी (दि.27) पाठवणार आहोत. केंद्रीय समिती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी बैठक घेईल. त्यावेळी आमच्या यादीवर विचार केला जाईल. त्यानंतर दिल्लीतून 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.
'या' दोघांवर निवडणुकीची जबाबदारी
काल (25 फेब्रुवारी) भाजपने चिंचवड मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीत भाजपची राजकीय रणनिती ठरली. या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू लक्ष्मण जगताप, पत्नी अश्विनी जगताप, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांच्यासह चिंचवडचे स्थानिक भाजपनेते उपस्थित होते. या सगळ्या पोटनिवडणूकीची जबाबदारी आमगार महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मी फडणवीसांकडून शिकलं पाहिजे...
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. मी देखील त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. राज्यात फडणवीस यांनी लहान वयात एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. ते कोणत्याही विषयावर माहितीच्या आधारे बोलतात आणि त्यांना कधीही विधान मागे घ्यावे लागले नाही. माझ्या सारख्याने त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी निरागसपणे काहीतरी बोलतो आणि माझं मोठं मन असल्याने दिलगिरीही व्यक्त करतो. त्यामुळे तुम्हाला फार काळ आंदोलन करण्याची मी संधी देत नाही. फडणवीस यांनी जे काही म्हटले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी बोलतो मग मला दिलगिरी व्यक्त करावी लागते, त्यामुळे त्यांच्याकडून मी धडा घेतला पाहिजे, असं ते म्हणाले.