Pune Helmet drive : रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आणि रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आजपासून सलग तीन दिवस पुण्यात हेल्मेट जनजागृतीची मोहीम राबविण्यात येणार आहे. आज या मोहिमेचा पहिला दिवस होता. यात पुण्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर हेल्मेट नसल्याने कारवाई करण्यात आली. पुण्यातील विविध कार्यलयाच्या बाहेर ट्रॅफिक पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली होती. त्यात तब्बल 622 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.


पुणे आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शासकीय कार्यालयात हेल्मेट जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यातील अनेक शासकीय कार्यलयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. यात 73 विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी विविध शासकीय कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता आणि शासकिय कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली होती.


'हेल्मेटसंदर्भात शासकीय कार्यलयात जनजागृती'


भारतात दररोज सुमारे 411 भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाच्या व्यक्तींमध्ये सुमारे 80  टक्के लोक या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80  टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात आला. या माध्यमातून हेल्मेटसंदर्भात शासकीय कार्यलयात जनजागृती करण्याचे आदेश देखील दिले होते. 


'तब्बल 622 कर्मचाऱ्यांवर कारवाई'



सुरुवातीला जनजागृती करणे आणि सरकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यास प्रोत्साहित करणे यावर भर दिला जाईल. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवरही कडक कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.  हा उपक्रम सुलभ करण्यासाठी, विद्यमान वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूच्या भागात नियुक्त करण्यात आले होते. त्यात तब्बल 622कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.


'हेल्मेट न वापरण्याची भन्नाट कारणं दिली पण...'


ही कारवाई करत असताना ट्रॅफिक पोलिसांनी शासकीय कर्चमाऱ्यांना हेल्मेटच महत्व पटवून दिलं. दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असल्याचं सांगितलं मात्र या अधिकाऱ्यांनी हेल्नमेट न वापरण्याचे भन्नाट कारणं पोलिसांना दिले.