पुणे : पुण्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील (Ganeshotsav 2023) गणेशोत्सवाला मोठा इतिहास आहे. शिवकालीन, पेशवेकालीन आणि त्यानंतर टिळकांनी सुरु केलेल्या गणेशत्सवाचा पुणे शहर साक्षीदार आहे. मोठ्या इतिहासाचादेखील साक्षीदार आहे. अनेक रंजक कथा, पौराणिक गोष्टी आणि त्यानंतर ऐतिहासिक वारसा आपल्याला पुण्यातील गणेशोत्सवात पाहायला मिळतो. मानाचे पाच गणपती, महत्वाचे काही गणपती, रंजक नावांचे गणपती आणि त्यानंतर येतात तालमीतील गणपती. पुण्यात अनेक तालमीत गणेशोत्सव साजरा केला जात होता.
1947 ला देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुस्तीची परंपरा पुढे गेली. पुण्यालाही कुस्तीचा इतिहास आहे. आमदार संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघाचे कै नामदेवराव मते ,पुणे शहराचे प्रथम महापौर कै बाबुराव सणस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कै मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात तालमीला चालना मिळाली. यात अनेक पैलवान तयार होत होते. यात अनेक पेशवेकालीन तालमीही होत्याच. प्रत्येक तालमीत हनुमानाचं मंदिर असतं. त्याचं प्रमाणे तालमीच्या पैलवानांनी गणपती बसवण्याचा निर्णय घेतला. पुढे तालमीतील गणपती मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. त्यांनी मंडळं स्थापन केली. आता हीच मंडळं पुण्यातल्या महत्वाच्या गणपती मंडळांमध्ये गणले जातात, असं पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी सांगितलं आहे.
अगदी मानाचा तिसरा गणपती हा ‘गुरुजी तालीम' आहे. त्याशिवाय वीराची तालीम मंडळ (शनिवार पेठ), शिवराम दादा तालीम तरुण मंडळ (गणेश पेठ), श्रीमंत डोके तालीम संघ (नाना पेठ), कुंजीर तालीम (सदाशिव पेठ), जोत्याची तालीम मंडळ (गणेश पेठ), पटवेकरी तालीम मित्र मंडळ (रविवार पेठ), दिसले तालीम (सदाशिव पेठ), अग्रवाल तालीम संघ (कसबा पेठ), गोकुळ वस्ताद आळी तालीम मंडळ (भवानी पेठ), खालकर तालीम ( सदाशिव पेठ), गायकवाड तालीम मंडळ (नारायण पेठ), निंबाळकर तालीम, नगरकर तालीम. साखळीपीर तालीम, जगोदाबाबा तालीम, शिवराम दादा तालीम, फणी आळी तालीम, डोके तालीम चिंचेची तालीम, लोखंडे तालीम, जोत्याची तालीम आणि बनकर तालीम अशा पुण्यातील अनेक तालमींचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत.
तसेच उपनगरातील जयनाथ तालीम धनकवडी आणि बिजली तालीम मित्र मंडळ, कर्वेनगर यांबरोबर पाषाण भागातील निम्हण आणि कोकाटे तालिमींचे गणपती प्रसिद्ध आहेत. हनुमान जयंती तर तालमींमध्ये साजरी होतेच त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव देखील साजरे केले जातात. त्यांच्यातल्या अनेक मंडळांच्या मूर्ती विशेष आहेत. काही तालमीच्या मंडळांच्या मल्ल रूपात उभ्या मूर्ती पहायला मिळतात.
(स्वप्निल नाहार आणि सुप्रसाद पुराणित यांच्या पुण्याचे सुखकर्ता या पुस्तकातून साभार)