पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महापालिकेकडूनही (Ganeshotsav 2023) गणेशोत्सवासाठीच्या नियोजनासाठी तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील गणेशमंडळांना महापालिकेकडून नियम घालून देण्यात आले आहेत. त्यात मूर्तीची उंची, उत्सव मंडपाची उंची आणि इतर काही बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
पाच वर्षाच्या परवानग्या ग्राह्य धरणार...
- मागील वर्षांपासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीकरिता 2019 चे सालामध्ये देण्यात आलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडप इत्यादींच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन परवान्याची गरज नाही.
- ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करावयाचा त्यांना परवाना लागणार, त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
- 2019 मधील परवानगीची जागा प्रकल्पबाधित झाली असेल किंवा दुसऱ्या नवीन ठिकाणी मंडप उभारणार असल्यास नव्याने परवाने घेणे बंधनकारक आहे.
- उत्सव मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी.
- 40 फुटांपेक्षा जास्तीचा उत्सव मंडप उभारायाचा असल्यास मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडावेत.
- सर्व परवान्यांच्या प्रती मंडप/कमानीच्या दर्शनी भागात प्लास्टिक कोटिंगमध्ये सहजपणे दिसतील अशा ठिकाणी लावाव्यात.
- गेल्या वर्षाप्रमाणेच सर्व क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मनपा मोकळ्या जागा गणेशमूर्ती विक्री स्टॉलसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
- मंडप आणि स्वागत कमानी उभारताना अग्रिशमन, रुग्णवाहिका तसेच प्रवासी बसेस, रहदारी करण्यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत.
- कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून 18 फुटांपेक्षा जास्त राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच स्वयंसेवक, सुरक्षारक्षक नेमावेत.
शाडू मातीच्याच गणेशमूर्ती वापरा
उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात यावा. गणेशमूर्ती या प्राधान्याने पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच वापराव्यात. मंडळे अथवा वैयक्तिक नागरिक यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना योगदान देऊन यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन पालिकेने केलं आहे.
शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक
गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कळवण्यात आलेल्या सूचना, नियम अथवा आदेशांचे सर्व गणेश मंडळांना पालन करणे बंधनकारक राहणार असणार आहे. उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी 3 दिवसांच्या आत स्वखर्चाने संबंधित मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती आणि अन्य साहित्य रस्त्यांवरुन ताबडतोब हटवून घेणे तसेच रस्त्यावरील घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटमध्ये बुजवून मनपाची जागा सुस्थितीत करणे बंधनकारक राहिल.
इतर महत्वाच्या बातम्या :