पुणे : पुण्यातील बहुतांश भागात पावसानं हाहाकार माजवल्यानंतर आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र, अरण्येश्वर परिसरात चंद्रकांत पाटील यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठीसाठी नाही तर पाटील हे फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला. तसंच पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
यावेळी अनधिकृत बांधकामांमुळे पुण्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे. यावेळी पाटील म्हणाले की, पालकमंत्री कुठं आहेत असं विचारलं जातं आहे. काल मी दिल्लीला अमित शाह यांच्याबरोबर पूर्वनियोजित बैठकीला गेलो होतो. परंतु मी इथल्या अधिकार्यांशी संपर्कात होतो. मात्र भेगडे आणि देशमुख हे मंत्री त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळं विरोधकांनी राजकारण करू नये, राजकारणासाठी निवडणूक आहे अशा वेळेस खांद्याला खांदा लावून पुढे गेले पाहिजे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फोन करुन परिस्थितीची माहितीदेखील घेतली होती, असेही त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे शहरात खूप अनधिकृत बांधकामं झाली आहेत. नालेच्या नाले नष्ट केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. या नाल्याच्या जागी बांधकामं केल्याने त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगली कोल्हापूरमधील नुकसानीच्या धर्तीवर पुण्यातील अतिवृष्टी बाधितांना मदत दिली जाईल. आचारसंहितेमुळे यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असून आयोगाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिखर बॅंक प्रकरणी बोलताना ते म्हणाले की, 2010 साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार होतं. राज्य सहकारी बँकेवर शरद पवार यांना मानणार सरकार होतं. त्याच्या सल्ल्याने चालत होतं. त्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी केलं असेल तर माहिती नाही असंही ते म्हणाले. या देशात ईडी, सीबीआय, कोर्ट यात सरकार लक्ष घालू शकत नाही. यामुळे यात भाजप सरकारचा कोणताही संबध नाही, असेही ते म्हणाले. इव्हेंट करून प्रसिद्ध मिळवली जाते. यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. हे छगन भुजबळ यांना अटक झाल्यावर का नाही झालं? असेही ते म्हणाले.
पूरपरिस्थितीची पाहणी करायला आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर नागरिकांचा संताप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Sep 2019 05:30 PM (IST)
विरोधकांनी राजकारण करू नये, राजकारणासाठी निवडणूक आहे अशा वेळेस खांद्याला खांदा लावून पुढे गेले पाहिजे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फोन करुन परिस्थितीची माहितीदेखील घेतली होती, असेही त्यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -