पंढरपूर : कोणीतरी माथेफिरु सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी करणारे लिखाण करतो, त्यानंतर सोलापुरात दंगल उसळते. गाड्यांची तोडफोड सुरु होते. याच दंगलीदरम्यान मुंबईहून सोलापूरला निघालेल्या एका गाडीवर दगडफेक सुरु होते. गाडीतील अनेक प्रवासी जखमी होतात. त्यात वसंत रुपनर नावाचा तरुणही गंभीर जखमी होतो. समाजकंटकांनी भिरकावलेल्या दगडांपैकी एका दगडाने वसंताच्या डोक्याचा वेध घेतला होता. त्यानंतर वसंत दोन महिने कोमात होता. डोक्याला जोरदार मार लागल्याने वसंतला पॅरालिसिस झाला. परंतु सरकारने अथवा इतर कोणीही त्याची मदत केली नाही. अखेर गेली पाच वर्ष जीवन-मृत्यूशी सुरु असलेला वसंताचा संघर्ष आज संपला आहे.

पाच वर्षांपूर्वी फेसबुकवर एका माथेफिरूने महापुरुषांची बदनामी केली त्यामुळे सोलापुरात दंगल उसळली होती. त्याचदरम्यान (31 मे 2014 )मुंबईहून येत असलेल्या एका बसवर दगडफेक झाली. या बसमधून गावाकडे जाणारा वसंत रुपनर या दगडफेकीमुळे जखमी झाला. जमीन विकून, कर्ज काढून वसंतच्या पत्नीने त्याच्यावर उपचार केले. परंतु वसंत कायमचा अधू झाला. वसंतला पॅरालिसिस झाला होता.

गेल्या पाच वर्षात वसंताकडे ना जुन्या सरकारने पहिले ना नव्या सरकारने. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि कमावता वसंत कायमचा अधू बनला. त्याची दोन मुले एका रात्रीत पोरकी झाली मात्र तरीही समाज, सत्ताधारी आणि प्रशासनाला रुपनर कुटुंबाची आठवण झाली नाही.

आपल्या पदरी फक्त अपंग शरीराच्या अनंत वेदना, उध्वस्त संसार आणि कर्जाचा डोंगर उरल्याचे लक्षात आल्यावर काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना अतिशय निराश झालेल्या वसंताने जगण्याची इच्छाच संपल्याचे सांगितले होते. अखेर त्या वसंताने या जगाचा निरोप घेतला, तोही त्याचा फाटलेला संसार उघड्या डोळ्याने पाहात.

आज वसंताच्या पत्नीलाही जगण्याची इच्छा उरलेली नाही. वसंतानंतर ज्या सरकारकडून रुपनर कुटुंबाने अपेक्षा ठेवली होती, त्या सरकारनेही या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. मदत मिळवण्यासाठी रुपनर कुटुंबीयांनी अनेक शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घातले, परंतु पदरी केवळ निराशाच आली.

आठ महिन्यांपूर्वी वसंत रुपनर यांच्याशी केलेली बातचित | 13 ऑगस्ट 2018


एबीपी माझाने काही महिन्यांपूर्वी वसंताची व्यथा समाजासमोर मांडली. त्यानंतर लोणावळ्याच्या एकटा निराधार संघाने पुढाकार घेत वसंताच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती.

जागून काय करायचे? असे म्हणणारी वसंताची पत्नी सखुबाई पूर्णपणे कोलमडून गेली आहे. वसंताच्या मोठ्या मुलाच्या (राहुल) शिक्षणाची जबाबदारी ज्या संस्थेने उचलली आहे, त्याच संस्थेने त्याच्या लहान मूकबधिर भावाच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील उचलली आहे.

वसंत रुपनर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या पत्नी सखूबाई यांच्याशी केलेली बातचित | 5 ऑगस्ट 2014



परंतु अजूनही सरकार आणि त्यांचे प्रशासन वसंतच्या कुटुंबाबाबत इतके संवेदनाशुन्य रितीने का वागत आहे, असा प्रश्न लोक विचारत आहेत. कोणतीही चूक नसताना वसंत असंख्य वेदना भोगून निघून गेला आहे. किमान आतातरी फडणवीस सरकारने त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात देऊन आधार द्यावा, अशी मागणी लोक करत आहेत.