फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे माऊलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली.
मागच्या अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक हा प्रकार करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केला आहे. पण असा प्रकार पुन्हा घडणार नाही, असं लेखी आश्वासन पोलिसांनी दिंडीच्या प्रमुखांना दिलं.
त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची मार्गस्थ झाली आणि पुणे मुक्कामी पोहोचली.
वारीत गोंधळ झाला नाही : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
गेली चार वर्ष संभाजी भिडे गुरुजींच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वारकरी धारकरी संगम हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही केवळ ज्ञानोबा, तुकोबांच्या दर्शनासाठी या वारीत सहभागी होत असतो. वारीत कोणताही गोंधळ झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारे तलवारीही नेण्यात आल्या नव्हत्या, असं स्पष्टीकरण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिलं आहे.