मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर मनसेमध्ये हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची साथ नसल्यास पुढे काय? याची रणनीती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक बोलावली.
राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज'वर मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज ठाकरे काही प्रश्नावर आमच्या सोबत असले तरी निवडणुकीत एकत्र नसतील, असं सांगत मनसे-राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याच्या चर्चांवर खुद्द शरद पवारांनी पडदा टाकला होता.
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीशी साधलेली जवळीक फुकट गेली की काय, असा मनसेसमोर प्रश्न आहे. महागठबंधनमध्ये स्थान मिळालं नाही तर करायचं काय यावर मनसेची खलबतं सुरु आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत मनसे मुंबई आणि ठाण्यासह तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहे. महागठबंधनमध्ये मनसेला स्थान मिळालं नाही, तरी मनसे लढवत असलेल्या तीन जागांवर आघाडीचा उमेदवार दिला जाऊ नये, असा प्रस्ताव ठेवण्याबाबत मनसेच्या गोटात चर्चा सुरु आहेत.
मोबदल्यात मनसेही आघाडीला इतर जागांवर मदत करु शकेल. या सर्व शक्यतांवर खल करण्यासाठीच मनसेची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महागठबंधनमधून वगळल्याने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची कृष्णकुंजवर खलबतं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2019 11:14 AM (IST)
राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज'वर मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -