Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी नामांतराची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर नामांतराच्या मागणीसाठी आजपासून चौंडी येथून रथयात्रा सुरू झाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर (punyashlok ahilyadevi nagar ) नामांतर कृती समितीच्या वतीने रथयात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचा समारोप होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडी येथून या रथयात्रेची सुरुवात झाली आहे. तसेच 20 फेब्रुवारी रोजी महामोर्च्याने समारोप होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी आणि शेवगाव या सर्व तालुक्यातून ही रथयात्रा जाणार आहे.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मोठं'
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून या यात्रेला सुरुवात झाली असून या रथयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्वच थोर व्यक्तींनी दिलेली दिशा हा आपला विचार बनलेला आहे. त्यामुळे या थोर व्यक्तींनी दिलेला विचार जपणं ही आपली जबाबदारी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कामं खूप मोठे आहे, त्यामुळे त्यांचे नाव जिल्ह्याला देण्याची मागणी होत असताना त्यांचं मग जिल्ह्याला द्यायला काय हरकत आहे, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. या सगळ्यात कोणी व्यक्तिगत राजकारण आणू नये, ही रथयात्रा अतिशय शांततेत जिल्हाभर जाणार आहे. भविष्यात नामांतर समितीला आणि रथयात्रेला कुणी विरोध केला, तर त्यांना आम्ही विरोध करू, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांच्याशी संवाद साधला आहे.
नगर नामांतरण बरोबर विभाजन झाले पाहिजे: आमदार राम शिंदे
अहमदनगर नामांतरणबाबत बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा आहे आणि त्यामुळे मी पालकमंत्री असताना जिल्ह्याचे विभाजन व्हावे हीच माझी भूमिका राहिली आणि नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची देखील भूमिका आहे की, जिल्ह्याचे विभाजन झालं पाहिजे. जिल्हा विभाजनाची चर्चा होत असतानाच जिल्ह्याच्या नामांतरणाचा देखील प्रश्न उपस्थित झालाय, विधिमंडळात देखील उपस्थित झाला आणि जिल्ह्याचे विभाजन होताच जिल्ह्याचे नामांतरण देखील झालं पाहिजे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या दृष्टिकोनातून देखील विधिमंडळामध्ये चर्चा झाली, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. या जिल्ह्याचं नाव बदलून अंबिकानगर, तर कधी फुले नगर व्हावं, अशा मागण्याही वेगवेगळ्या संघटनांकडून होत आहे.