पुणे: सहा जिल्ह्यांची जबाबदारी काय घेऊन बसलात, मी तर अख्खा महाराष्ट्र चालवलाय असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलं आहे. तुम्हच्याकडे भविष्यात सत्ता आली तर तुम्हालाही दोन-चार जिल्हे कसे सांभाळायचे याचा गुरुमंत्र देतो असाही टोला त्यांनी लगावला. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 


आपल्याकडे एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं तरी नाकीनऊ येत होतं, देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत, त्यांचं कसं काय होणार असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलाय? मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. राज्याचा नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे हे सर्व जिल्हे आहेत. भविष्यात त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनाही दोन-चार जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कशी सांभाळायची याचा गुरुमंत्र मी त्यांना देईन."


पीएफआयवर नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. ते दिवसभर काही ना काही कॉमेडी करत असतात. त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


दरम्यान, पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 


काय म्हणाले होते अजित पवार? 


अजित पवारांनी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "पालकमंत्र्यांची नेमणूक केली ही चांगली गोष्ट आहे. काही मंत्र्यांकडे एका जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली, तर काहींच्या कडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. देवेंद्र फणडवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मी पुण्याचा पालकमंत्री असताना नाकीनऊ यायचं, आठवड्यातून एकदा तरी वेळ द्यावा लागायचा. कामाचा व्याप खूप असतो. पण ज्यांच्याकडे सहा सहा जिह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचं कसं काय होणार हे त्यांनाच माहिती. लोकांची कामं थांबली नाही पाहिजेत. त्यांना शुभेच्छा."


महत्त्वाच्या बातम्या: