Maharashtra Corona Update : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. यातून आता थोडाफार दिलासा मिळाला असला तरी यातून अजून पूर्ण मुक्तता झालेली नाही. अद्याप देखील कोरोनाचे रूग्ण रोज सापडत आहेत. रविवारी महाराष्ट्रात 541 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दोन-तीन आठवड्यापासून रूग्ण संख्येत चढ-उतार होत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घटत चाललेली रूग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. याबरोबरच कोरोनाने अद्याप देखील मृत्यू होत आहेत. आज महाराष्ट्रात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 546 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात 546 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून बऱ्या झालल्या रूग्णांची संख्या  79,67,314 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 98.13 टक्के झालाय. 


दोन बाधितांचा मृत्यू 
आज राज्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्यू दर 1.82 टक्के झाला आहे.  


सक्रिय रूग्णांमध्ये घट
कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असले तरी सक्रिय रूग्णांच्या संख्येत मात्र रोज घट होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या  3,702 सक्रिय रूग्ण आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 1245 सक्रिय रूग्ण आहेत. तर त्या खालोखाल मुंबईत 732 सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे मुंबईत होते. परंतु, गेल्या काही दिवासंपासून आता मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहान आरोग्य विभागाने केले आहे. ठाणे जिल्हा तीन नंबरला आहे. ठाण्यात सध्या 446 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. 


देशातील स्थिती 


देशातील कोरोना रूग्णांमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे.आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याआधी 24 सप्टेंबरला देशात 4 हजार 912 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 81 रुग्णांनी कमी झाली आहे.