Pune-Ahmednagar Highway Accident : अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघात हे नित्याचेच झाले आहेत. महिनाभरात या महामार्गावर केवळ सुपा परिसरात झालेल्या अपघातात 24 व्यक्तींना आपला जीव गमावावा लागला आहे. रस्त्यावरील  दुभाजक तुटलेले, गतीरोधक नाही, सूचना फलक नाही, सर्व्हिस रोड नाही, रस्त्यावर वाढत चाललेली अतिक्रमणे यामुळे नगर-पुणे महामार्ग हा  मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर असलेले हॉटेल व्यवसायिक आणि इतरही व्यावसायिकांनी अनधिकृतपणे दुभाजक तोडले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे अविनाश पवार यांनी केला आहे. तर या रस्त्यावर असलेल्या टोलवर अपघात घडल्यानंतर मदत करण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचेही पवार यांनी सांगितले. 


याबाबत दोनच दिवसांपूर्वी पारनेरचे तहसीलदार, सुपा पोलीस स्टेशनचे पीआय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना कराव्यात अशी सूचना देण्यात आली. त्यावर आठ दिवसांच्या आत उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलं. मात्र त्याबाबत कारवाई सुरू होण्याच्या आतच आज झालेल्या अपघात आणखी एक बळी गेला आहे. वाडेगव्हाण शिवारात कंटेनरने महिलेला  चिरडल्याची घटना घडली. या अपघातात देऊळगाव सिद्धी येथील गंगुबाई सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला. गंगुबाई या आपला मुलगा आणि छोटी नातीसोबत शिरुरहून नगरच्या दिशेने येत असताना भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात गंगुबाई यांचा जागीच मृत्यू झाला.


सुपा परिसरात नव्याने आठ अपघात प्रवणक्षेत्र आढळून येत असून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाय योजना का केली नाही? असं म्हणत आतापर्यंतअपघातात मृत्यू झालेल्या वाहनचालकांच्या मृत्यूस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे अविनाश पवार यांनी केली आहे.


दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय टीमगिरे यांनी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. बऱ्याच अपघातात दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांना जीव गमवावा लागतो त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Devendra Fadnavis : क्या हुआ तेरा वादा? BDD चाळीतील पोलिसांसाठीच्या मोफत घरांवरून फडणवीसांचा यु-टर्न!
Thane : आमचं दुखणं वेगळं, सांगता येत नाही अन्...; मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे महापालिकेच्या कारभारावर भाजपची टीका