पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत रात्रीच्या वेळेस थरारनाट्य पाहायला मिळालं. मैत्रिणीशी बोलत थांबलेल्या एका तरुणावर अॅसिड हल्ला आणि गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये रोहित खरात हा तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोराने गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमसंबंधातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची चर्चा आहे.

सदाशिव पेठेतील एका गल्लीबोळात मंगळवारी (16 एप्रिल) रात्री हा प्रकार घडला. टिळक रोडवरील बादशाही बोर्डिंग गल्लीमधील स्वप्नगंधा अपार्टमेंटच्या मेनगेट समोर रोहित थोरात आपल्या मैत्रिणीसोबत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोलत थांबला होता. त्यावेळी हल्लेखोर सिद्धराम विजयकुमार कलशेट्टीने मागून येऊन त्याच्यावर अॅसिड टाकत गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर जवळच्याच एका इमारतीच्या गच्चीवर जाऊन लपून बसला होता.

अॅसिड हल्ल्यात रोहितच्या चेहऱ्याला आणि पाठीला इजा झाली. त्याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याला गोळी लागलेली नाही.

या कृत्यानंतर हल्लेखोराने स्वत:लाही संपवलं. पोलिसांपासून तो लपताना तो गच्चीवरुन इमारतीच्या डक्टवर पडला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढण्याचं आव्हान पोलिस आणि अग्निशमन दलासमोर होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढलं तेव्हा तो मृतावस्थेत होता.

VIDEO | पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार

हल्लेखोराकडे पिस्तुल असल्याने पोलिस काळजीपूर्वक कारवाई करत होते. रोहितवर हल्ला केल्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली होती. पोलिस आणि अग्निशमन दल त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. डक्टमध्ये पडल्यामुळे तो जखमी झाला होता. सुमारे तासभर तो तिथे अडकला होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर त्याला इमारतीमधून बाहेर काढलं. पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पुणे अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपी सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी


दरम्यान, हे थरारनाट्य घडताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरात स्पर्धा परीक्षांचे क्लासेस असल्यामुळे अनेक विद्यार्थी या भागात येतात.