कोल्हापूर : मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. "सभांवर आम्ही खर्च करतो तर आमच्याच खात्यात खर्च मोजणार ना," असंही ते म्हणाले. तसंच माझ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची हे भाजपवाल्यांना समजत नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. कोल्हापुरातील इचलकरंजी इथल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीविरोधात प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असलेल्या जिल्ह्यात/मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. मात्र यावरुन भाजप नेते विनोद तावडे यांनी राज यांच्या सभेच्या खर्चाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावरुन राज ठाकरेंनी आज उत्तर दिलं.

राज ठाकरे म्हणाले की, "गुढीपाडव्याला माझी सभा झाली. त्याआधी दोन मेळावे झाले. मग नांदेडला सभा झाली, काल सोलापूरमध्ये, आज इचलकरंजी, उद्या साताऱ्यात सभा होणार आहे. माझा उमेदवार नाही, मी निवडणूक लढवत नाही. तरी भाजपवाले फडफडतायत. निवडणूक आयोगाकडे तक्रार करतायत. खर्च मोजायचा कशात? आमच्या खात्यात. मोजायचा कशात म्हणजे काय? आम्ही खर्च करतोय, आमच्याच खात्यात मोजणार ना? त्यांना समजत नाही उत्तरं कशी द्यायची? काय उत्तरं द्यायची? राज ठाकरे जे प्रश्न विचारतोय, राज ठाकरे ज्या क्लिप्स दाखवतोय, याची उत्तरं काय द्यायची, हे भाजपवाल्यांना कोणालाही समजत नाही. कारण त्यांना अपेक्षाच नव्हती अशा गोष्टींची, की जुनं काहीतरी मी उकरुन काढेन. मी हे जे करतोय ना, एक गोष्ट निश्चित होईल की देशातील कोणताही राजकारणी तुमच्यासमोर उभा राहिल तेव्हा खोटं बोलणार नाही. तुम्हाला फुकटची स्वप्न दाखवणार नाही. खोटं बोलून तुमची मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण त्यांनी जी गोष्ट केली तर पाच वर्षानंतर अशाच क्लिप्स दिसणार."

दरम्यान, राज ठाकरे यांनी आतापर्यंतच्या सभेत एअर स्ट्राईक, डिजिटल इंडिया आणि इतर मुद्यांवरुन नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना टार्गेट केल्यानंतर, त्यांनी आपला मोर्चा स्वच्छ भारत योजनेकडे वळवला. आठवड्याभरात मोदी सरकारने लाखो शौचालयं बांधलीच कशी असा सवाल उपस्थित करताना राज ठाकरेंनी इंटरेस्टिंग आकडेवारी सादर केली.

राज ठाकरे म्हणाले की, "स्वच्छ भारत अभियानात आम्ही एका आठवड्यात 8 लाख 50 हजार शौचालयं बांधली, असा दावा नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये केला होता. पण आकडा काढून बघा 8 लाख 50 हजार शौचालयं 1 आठवड्यात म्हणजे 1 मिनिटात 84 शौचालयं आणि 5 सेकंदात 7 शौचालयं बांधली जातील. हा विक्रम म्हणायला पाहिजेच. इतक्या फास्ट होत पण नाही, तितक्या फास्ट त्यांनी संडास बांधले."

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- बेसावध राहू नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की 2014 ला झालं ते झालं. एक वाईट स्वप्न म्हणून विसरुन जाऊया. ह्या देशातील राजकीय क्षितीजावरुन मोदी आणि शाह यांना आपल्याला हटवायचं आहे म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे : राज ठाकरे

- सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बँक यासारख्या स्वायत्त संस्थाना हात घालून यांनी लोकशाही धोक्यात आणली. हेच 1930 मध्ये जर्मनीत हिटलर करत होता. प्रचारासाठी हिटलर फिल्म काढायचे आणि नेमकं हेच मोदी आज करत आहेत : राज ठाकरे

- जवानांपेक्षा व्यापाऱ्यांमध्ये जास्त साहस असतं असं पंतप्रधान म्हणतात, एकदा अनिल अंबानींना घेऊन जा ना सरहद्दीवर बंदूक घेऊन : राज ठाकरे

- शहीद जवानांच्या नावावर मतं मागताना लाज नाही वाटत पंतप्रधानांना? सैनिकापेक्षा व्यापारी हा जास्त शूर असतो असं पंतप्रधान म्हणाले. या वाक्यातून यांच्या मनात सैनिकांबद्दल काय भावना आहेत हे कळतं : राज ठाकरे

- पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हायला हवे. दुश्मन राष्ट्राचा पंतप्रधान हा आपल्या देशात कोण निवडून यावा हे का बोलतोय? काय कटकारस्थान आहे या मागे? : राज ठाकरे

- बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये आम्ही 250 माणसं मारली, असं अमित शाह म्हणाले. अमित शाह गेले होते का को-पायलट म्हणून? जो मदरसा उद्ध्वस्त केला असा दावा यांनी केला, तो मदरसा अजून आहे तसा आहे हे माध्यमांनी दाखवलंय : राज ठाकरे

- नरेंद्र मोदी हे ह्या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत जे माध्यमांना एकदाही सामोरे गेले नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत : राज ठाकरे

- गंगेच्या स्वच्छतेसाठी 20 हजार कोटी खर्च केले ना, मग कुठे झाली स्वच्छ गंगा? कुठे गेले 20 हजार कोटी रुपये? : राज ठाकरे

- बेरोजगार तरुण नोकरीचं शोधात फिरतोय आणि हे येणार तुम्हाला स्वप्न दाखवणार आणि पुन्हा तुमच्या पदरी पुन्हा निराशा. किती काळ चालू राहणार आहे हे सगळं? : राज ठाकरे

- बिहारमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले कि, "स्वच्छ भारत अभियानात आम्ही एका आठवड्यात 8 लाख 50 हजार शौचालयं बांधली". किती थापा माराल? आकडा काढून बघा 8 लाख 50 हजार शौचालयं 1 आठवड्यात म्हणजे 1 मिनिटात 84 शौचालयं आणि 5 सेकंदात 7 शौचालयं बांधली जातील. हा विक्रम म्हणायला पाहिजेच. इतक्या फास्ट होत पण नाही, तितक्या फास्ट त्यांनी संडास बांधले."

- मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. बिहार मध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले 1 आठवड्यात 50 लाख शौचालय बांधली. काय बोलत आहेत पंतप्रधान? : राज ठाकरे

- देशाबाहेरचा काळा पैसा आणण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करु, गरज पडली तर कायदे बदलू आणि कसंही करुन देशात काळा पैसा आणू, आणि नोकरदारांना त्यांच्या प्रामाणिकतेसाठी त्यातला काही भाग देऊ, असं मोदी म्हणाले होते आणि अमित शाह सत्तेत आल्यावर म्हणाले हा तर चुनावी जुमला होता : राज ठाकरे

- देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये जमा करेन असं पंतप्रधान म्हणाले होते, काय झालं ह्या आश्वासनाचं? : राज ठाकरे

- पंतप्रधान नोटाबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, नमामि गंगेबद्दल का बोलत नाहीत? जवानांच्या नावावर मतं का मागताय? : राज ठाकरे

- काही शे कोटी खोट्या नोटांसाठी तुम्ही अर्थव्यवस्थेतल्या 16 लाख कोटी नोटा काढून घेतल्या. नोटाबंदीचा हेतू स्वच्छ नव्हता. नोटबंदीमुळे कोट्यवधी नोकऱ्या गेल्या, लोकं देशोधडीला लागले, इथल्या इचलकरंजीमधले यंत्रमाग कामगार देशोधडीला लागले : राज ठाकरे

- भाजपने काळ्या पैशाबद्दल बोलूच नये. कारण 2014 ते 2019 च्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी या पक्षाने वारेमाप पैसा खर्च केला तो कुठून आला? : राज ठाकरे

- रिझर्व्ह बँकेच्या दोन गव्हर्नरनी राजीनामा दिला. नोटबंदी करताना आरबीआयच्या गव्हर्नंरना विश्वासात नाही घेतलं, अर्थमंत्र्याला विश्वासात घेतलं नाही, मंत्रिमंडळाला विश्वासात घेतला नाही. एका माणसाला झटका आला आणि त्यांनी नोटा बंद करुन टाकल्या : राज ठाकरे

- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बाहेर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आहे हे सांगितलं आणि कारण जस्टीस लोया यांच्या मृत्यूबाबत काही शंका होत्या आणि त्याचा संबंध अमित शाह यांच्याशी होता : राज ठाकरे

- मी ज्या पद्धतीने प्रश्न विचारतोय त्याचा एक फायदा लक्षात घ्या की यापुढे कुठलाही राजकारणी खोटं बोलणार नाही तुम्हाला गृहित धरणार नाही कारण ते खोटं बोलले तर अशा क्लिप्स बाहेर येणार, लोक प्रश्न विचारणार : राज ठाकरे

- भाजपला उत्तर कसं द्यायचं हे समजत नाही : राज ठाकरे

- मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत, निवडणूक आयोगाला विचारत आहेत कुठल्या खात्यात खर्च मोजायचा. कुठल्या खात्यात म्हणजे? आमच्याच खात्यात : राज ठाकरे

- अटकेपार झेंडा रोवलेला हा महाराष्ट्र आहे, हे राज्य कायम प्रगतिशील आहे. माझ्या गुजरात दौऱ्यात पण मी हेच सांगितलं होतं की देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकांवर आहे आणि ह्याला मराठी मातीवर संस्कारच असे झालेत.

- 1904 साली इचलकरंजीमध्ये देशात यंत्रमाग सुरु झाला, 1970 साली आताच्या नॅनोसारखी छोटी गाडी जिचं नाव मीरा होत ती इथे सुरु झाली. इतकी हरहुन्नरी माणसं या राज्यात असताना आम्हाला काय 'मेक इन इंडिया' शिकवताय? : राज ठाकरे

- नरेंद्र मोदी आणि अमित शाह नावाचं देशावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून मी प्रचार करतोय : राज ठाकरे

राज ठाकरे यांची सभा