मुंबई : पावसानं ओढ दिल्यानं कृषी उत्पादनाला मोठा फटका बसलाय. याचाच परिणाम थेट डाळींच्या किंमतीवर होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किंमतीत किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकचं सर्वसामान्य घरातील गृहीणींच बजेट पुरतं कोलमडून गेलं आहे.


वाशी येथील घाऊक बाजारात डाळींचे दर किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढले असून किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी ओलांडली आहे. मसूर, मूगडाळ, उडीद, चणाडाळीच्या किंमतीही 90 रुपयांच्या घरात गेल्या आहेत.

सरकारकडे डाळींचा मोठा साठा असला तरी तो अद्याप खुला करण्यात आलेला नाही. आयातबंदीचा परिणामही बाजारपेठेवर दिसू लागला आहे, असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे. डाळींच्या वाढत्या किंमतीवर सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास दरात अधिक वाढ होण्याची चिन्ह आहेत.

यंदा देशभरातील बहुतेक राज्यांवर दुष्काळाचं सावट आहे. मराठवाड्यासह राज्यभरात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं यंदाही कडधान्य आणि डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डाळींच्या दरात वाढ

तूरडाळ  -  90 ते 100

मूगडाळ - 95

चणा डाळ - 80

मसूरडाळ - 85

उडीद उडीद – 95