Sachin Ahir on Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीमधील सभेत केलेल्या हल्लाबोलनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी पलटवार केला आहे. 


कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडले आहे हे जनताच ठरवेल, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार सचिन अहिर यांनी केला. अहिर यांनी कोल्हापूरमध्ये बोलतांना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून कोणताही मंत्री कोणत्याही खात्यावर बोलतो. उद्योगमंत्री कृषी खात्यावर बोलतात, मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत की उद्योग करणारे मंत्री आहेत? 


आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भाजपचे 105 आमदार खासगीत सत्ता कोणासाठी आणि कशासाठी असल्याचे विचारतात. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना स्वतःचे भविष्य बघण्यात रस आहे. संपूर्ण महाराष्ट्र व जनतेचे ते काय भविष्य बघणार ? असा प्रश्न अहिर यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनापूर्वी वीज बिल माफीचा निर्णय घेतला नाही तर विधिमंडळाचे कामकाज पहिल्या दिवसापासून रोखून धरू असा इशाराही अहिर यांनी दिला.


जनतेच्या प्रश्नांची चर्चा नाही‌, मंत्रिमंडळ विस्तार नाही


ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशन होऊ घातले असताना जनतेच्या प्रश्नांची चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. मात्र, शिंदे फडणवीस सरकार अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची चर्चा करत नाही.  मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अहिरे यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राज्यपाल हा जनतेचा आवाज व्हायला पाहिजे. मात्र, राज्यपाल सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. ज्या पक्षाकडून नियुक्ती झाली ते त्यांचा निषेधही करत नाहीत. त्यांना प्रोत्साहन दिले जाते की काय अशी स्थिती आहे. राज्यपाल हटाव ही शिवसेनेची मागणी आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल हटाव भूमिकेचं स्वागत आहे. 


उद्धव ठाकरे यांचा शेतकरी मेळाव्यातून हल्लाबोल 


उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शेतकरी मेळाव्यात शिंदे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले, तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. परंतु, मिंधे सरकारकडून काही अपेक्षा नाही. तुम्ही खोके घेतलेत हे आम्ही म्हणत नाही. तुमचेच आमदार सांगतर आहेत. बच्चू कडू यांनी या आधी देखील सांगितलं की, कोणाच्या लग्नात गेलो, तरी लोक खोक्यांवरून बोलत आहेत. परंतु, हे खोके पचणार नाहीत. जनता याची भरपाई करेल. आम्ही तुम्हाला सोडलेलं नाही. बोक्यांना खोक्यांची भूक होती म्हणून गद्दारी करुन गेले. देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायम राहिल. ही ओळख पुसता येणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या