ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लोकं अडकली आहे. या लोकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी आम्हाला परिवहन मंत्र्यांनी बसेस देण्याबाबत परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सरकारकडून एसटी बसेसमार्फत ही मोफत सेवा दिली जाणार आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला साधारण वीस कोटीच्या आसपास निधी उपलब्ध करून देणार आहोत. तसेच यासाठी आणखी खर्च लागला तरी तो देण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वत:च्या जिल्ह्यात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या सर्वच लोकांना पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्व जिल्ह्यात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी मायभूमीत दाखल
राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. एकीकडे परराज्यातील मजुरांना ट्रेन मधून पाठवताना ट्रेनच्या तिकिटाचे पैसे यावरून वाद असताना राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकार स्वतः तिकिटांचा भार उचलणार आहे.
याआधी एसटीच्या 70 बसेसद्वारे राजस्थान राज्यातील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या स्वगृही सोडण्यात आलं होतं. त्यानंतर आता एसटीच्या मदतीने राज्यातल्या विविध जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे.