मुंबई : भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा जोतिबा फुले ( Mahatma Jotiba Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत (Dr. Babasaheb amberdkar ) केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जातोय. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने (protests) केली जात आहेत. 
 
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातील कोथरूड परिसरातील चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाच्या जवळ हे आंदोलन  करण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात ठिकठिकाणी बॅनर लालून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळीत सावित्रीबाई फुले पुतळा या ठिकाणी विद्यार्थीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. 


महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट पसरलीय.  चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी देखील तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय. 


 औरंगाबादमध्ये वंचितच्या वतीने निषेध  


चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील गोपालटी परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. अचानक कार्यकर्ते आल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आंदोलकांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. शिवाय चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद शहराचं आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना विरोध दर्शवण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.  


नांदेडमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचा अंत्यविधी
 
नांदेडमध्ये चंद्रकांत पाटली यांच्या वक्तव्यावरून स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडकडून अंत्यविधी यात्रा काढण्यात आली आणि प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध  व्यक्त करण्यात आला. संभाजी ब्रिगेड आणि इतर सामाजिक संघटनांनी निषेध आंदोलन करून संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 


अमरावतीत जाळले पोस्टर
अमरावतीत वंचित बहुजन आघाडी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्रमक झाली असून अमरावतीच्या इर्विन चौकात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाटील यांचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.  
 
धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज  
 
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेली धुळे शहर पोलिस ठाण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय.   


सोलापुरात आंबेडकरी संघटना आक्रमक 
 
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापुरात भीम आर्मी आणि युवा भिमसेनेतर्फे  दोन ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर युवा भीमसेनेने भाजप कार्यालयासमोरच चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. 


 नंदुरबारमध्ये निदर्शने 
 
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निदर्शनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपुरुषांचा संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  


महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी! औरंगाबादमध्ये चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड