लातूर : जिल्ह्यात सध्या महामार्ग क्रमांक 752 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शेतकऱ्यांशी न बोलता, त्यांना कोणताही मोबदला न देता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर रस्त्यांचे काम सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी याचा मोबदला मागितला परंतु त्यांना कोणतेही लेखी किंवा तोंडी आश्वासनदेखील दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज लातूरमध्ये रस्त्याचे काम थांबवले, परिणामी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सरकारला लातूरातील रस्त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जाणार आहेत. या रस्त्यासाठी वाढीव भूसंपादनाची कोणतीही माहिती न देता काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज रस्त्याच्या कामाला विरोध केला.
यापूर्वीदेखील शेतकऱ्यांनी याप्रकरणी आंदोलने केले. परिणामी सरकारने बाधित 600 शेतकऱ्यांपैकी पाच टक्के शेतकऱ्यांना 54 कोटी 70 लाख रुपये मोबदला दिला आहे. उरलेल्या 95 टक्के शेतकऱ्यांना अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामध्ये प्रामुख्याने अंसरवाडा लांबोटा आणि निलंगा शिवारातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी आज दुपारी काम बंद आंदोलन केले. शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबवल्यानंतर कंत्राटदाराच्या तक्रारीवरून निलंगा पोलिसांनी येथील 47 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका शेतकरी महिलेचा समावेश आहे.
काही दिवसापूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. संतप्त शेतकऱ्यांनी जामीन घेण्यासाठी नकार दिला होता. हे प्रकरण निलंगा कोर्टात सादर केल्यानंतर यातील दोषी शेतकऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
जमिनीचा मोबदला तर मिळालाच नाही, परंतु त्यासाठी आंदोलन केले तर थेट तुरुंगवास भोगावा लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे भुसणी, पानचिंचोली, बाभळगाव, निटूर, मुगाव यांसह दहा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांनी शेतजमिनींचा मोबदला मागितला, सरकारने तुरुंगवास दिला
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
12 Jan 2019 11:35 PM (IST)
लातूर जिल्ह्यात सध्या महामार्ग क्रमांक 752 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शेतकऱ्यांशी न बोलता, त्यांना कोणताही मोबदला न देता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर या महामार्गाचे काम सुरु केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -