कोल्हापूर : थकित बिल न दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातल्या आसुर्लेच्या दत्त साखर कारखान्यामध्ये तुफान तोडफोड केली. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांचे थकित बिल दिले जात नाही, तोपर्यंत कारखाना चालू देणार नसल्याचा इशाराही दिला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ऊस गाळप हंगाम जवळ आला आहे. मात्र, कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांना मागील थकीत बिल अद्याप मिळालेलं नाही. तसेच गेल्यावर्षी शेतकऱ्यांना टनामागे दोन किलो साखर देण्याऐवजी 1 किलो साखर देण्यात आली. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कारखाना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेले होते.

पण यावेळी प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याची तोडफोड केली. अकाऊंट ऑफिस, शेती ऑफिस, संगणक ऑफिस यासह अन्य केबिन्सची तोडफोड केली.

तसेच, जोपर्यंत थकित बिलं दिलं जात नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करु दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.